नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात आता भाजपानेही उडी घेण्याची तयारी केली असून, भाजपाचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी स्वतंत्र पॅनल उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायत गटातील दोेन व सोसायटी गटातील बहुसंख्य मतदार शिवसेनेच्या गोटातील असल्याचा दावा करीत शिवसेनेनेही बाजार समितीच्या रणांगणात उडी घेण्याची तयारी चालविली असून, महापालिका स्थायी समिती सभापती शिवाजी चुंबळे यांच्याशी घरोबा करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. शनिवारी यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे व माजी आमदार बबनराव घोलप यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र खरी लढत राष्ट्रवादीचे माजी खासदार व बाजार समितीचे विद्यमान अध्यक्ष देवीदास पिंगळे व महापालिका स्थायी समितीचे सभापती व जिल्हा बॅँक संचालक शिवाजी चुंबळे यांच्यातच होणार आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही वर्षांपासून माजी खासदार देवीदास पिंगळे यांची एकहाती सत्ता आहे; मात्र नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅँकेच्या पराभवाची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी त्यांना चांगलीच कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात आता भाजपा
By admin | Updated: June 12, 2015 01:20 IST