लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : सोशल नेटवर्किंग फोरमतर्फे वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दिंडोरी रोडवर म्हसरूळ परिसरात पाच एकर जागेवर नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने संत तुकाराम वनउद्यान साकारले आहे. मागील वर्षी दि. २६ जून २०१६ रोजी पालिकेच्या साडेचार एकर जागेवर श्रमदानातून २२०० रोपांची लागवड केली होती. त्यानंतर गेले वर्षभर अनेक अडचणींचा सामना करत फोरमच्या सदस्यांनी झाडांची निगा राखली. लोकसहभागातून खते, टँकरचे पाणी पुरवण्यात आले. या कष्टाचे फलित म्हणजे एक वर्षानंतर २२०० पैकी १८०० रोपे जगवण्यात फोरमच्या टीमला यश आले. याच झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना घेऊन नाशिकच्या महापौर रंजना भानसी आणि नगरसेवक अरुण पवार यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक स्वाती भामरे, राजीव भामरे, सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, अभियंता प्रशांत बच्छाव, डॉ. मनीष देवरे, डॉ. आशिश चौरसिया, प्रा. जोशी, प्रा. शिंपी, विनय बिरारी, संजय कोकणे, डॉ. योगेश जोशी, डॉ. माधवी मुठाळ, स्मिता चव्हाणके, पराग दास्ताने, डॉ. हत्ते, डॉ. शैलेश सुराणा, उद्यान निरीक्षक राहुल खांदवे, खंडेराव डावरे, वैभव उपासनी, प्रकाश देवरे, तुषार भदाणे यांच्यासह ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामदास शिंदे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. वाढलेली झाडे बघून उपस्थित नाशिककरांनी समाधान व्यक्त केले.
१८०० वृक्षांचा वाढदिवस
By admin | Updated: June 28, 2017 00:40 IST