नाशिक : एखाद्या खेड्याला शहर बनविण्यासाठी सर्वप्रथम सार्वजनिक स्वच्छता आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे संस्कार गरजेचे आहे. आपण शहरात राहतो हा नाशिककरांचा एक गैरसमज आहे, असे मत ज्येष्ठ क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांनी व्यक्त केले.वसुंधरा महोत्सवाला शहरात मंगळवारपासून (दि.९) प्रारंभ करण्यात आला. ‘माझे शहर : स्मार्ट आणि शाश्वत’ अशी या वर्षाची संकल्पना ठरविण्यात आली होती. गुरुवारी (दि.११) गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात विविध पर्यावरणस्नेही व्यक्ती व संस्थांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबाबत वसुंधरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाम बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पुरस्कारार्थी प्रसिद्ध वास्तुविशारद संजय पाटील, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी, ‘केअर नाशिक, ग्रीन कॉल’ अभियानचे प्रमुख धनश्री हरदास, सॅमसोनाईट वृक्षारोपण अभियानाचे वाय. एम. सिंग, वसुंधराचे व्यवस्थापक वीरेंद्र चित्राव, हेमंत बेळे, मंदार पराशरे आदि उपस्थित होते. यावेळी बाम म्हणाले, वैयक्तिक स्वच्छतेबाबत नाशिककर सजग आहेत; मात्र सार्वजनिक स्वच्छतेबाबत अद्याप या खेड्यात उदासीनता दिसून येते. स्मार्ट-शाश्वत शहर बनविण्याअगोदर सार्वजनिक स्वच्छता आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबत असलेली मरगळ नाशिककरांना झटकावी लागणार आहे, तरच येणाऱ्या पिढीला एक चांगले अद्ययावत सुरक्षित शहर आपण देऊ शकू , असे बाम म्हणाले. कचरा जाळण्यासारखे मोठे दुसरे पाप नाही, त्यामुळे या पापापासून आपण दूर रहावे, असे आवाहन करताना शहराच्या प्रारंभी कचऱ्याचा ढीग साठवून तो जाळण्यात येतो, हे दुर्दैव असल्याची खंतही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
भीष्मराज बाम : पर्यावरणस्नेही व्यक्ती-संस्थांना वसुंधरा सन्मान
By admin | Updated: August 12, 2016 00:52 IST