नाशिक : बहीण-भावाच्या घट्ट नात्याची वीण, त्यातून निर्माण होणारा जिव्हाळा तर दुसरीकडे बहिणीवर येणारी वेगवेगळी संकटे आणि यामुळे भावापुढे निर्माण होणारे प्रश्न याचे चित्रण ‘भोवरा’ या दीर्घांकातून दाखविण्यात आले. शुक्रवारी (दि. २१) लोकहितवादी मंडळ यांच्यातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात या दीर्घांकाचे आयोजन करण्यात आले होते.जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘भोवरा’ या कथेवर आधारित या दीर्घांकात बहीण आणि भाऊ यांच्या नात्यातला विलक्षणपणा दर्शविण्यात आला आहे. गोपाळ हा आपली बहीण नमुताई हिच्याकडेच वास्तव्यास असतो. नमुताईच्या आयुष्यात अनेक संकटे उभी राहतात. नमुताईच्या पतीचे आजारपणामुळे लवकर निधन होते यातून सावरत नाही तोच नमुताईच्या मुलाचेही निधन होते. नमुताईचा भाऊ गोपाळ हा आपल्या बहिणीला आणि भाच्याला कुठलीही कमतरता भासू नये यासाठी विशेष काळजी घेताना दिसतो. बहीण आणि भाचा यांच्या महत्त्वपूर्ण गरजांबरोबरच त्यांचे हट्ट पुरविले जावेत, यासाठी गोपाळ हर प्रकारे प्रयत्न करत असतो.या दीर्घांकात रोहिणी जोशी (नमुताई), महेंद्र चौधरी (गोपाळ), स्वराली हरदास (शांतू), कौमुदी गदगे (मंगळ), अर्णव सोनजे (माधव), समृद्धी वाघमारे (मालती), स्वप्निल जोशी (दत्तू), कृष्णा ढुमणे (राजाराम), स्वप्निल डोळस (सायकलवाला), स्वानंदी वाघमारे (छोटी नमुताई), अवधूत पंडित (छोटा गोपाळ), अभिषेक देशपांडे (डॉक्टर) या कलाकारांचा सहभाग आहे. भोवरा या दीर्घांकाचे दिग्दर्शन अपूर्वा शौचे-देशपांडे, नेपथ्य आदित्य समेळ, कृष्णा ढुुमणे, पार्श्वसंगीत प्रसून पाठक, सागर संत, प्रकाश योजना निकीता पवार, आकाश पाठक, रंगभूषा स्वाती शेळके, वेशभूषा सागर पाटील तर केशभूषा समृद्धी वाघमारे यांची होती. भोवरा या दीर्घांकाचे निर्मिती सूत्रधार जयप्रकाश जातेगावकर हे होते.
जबाबदाऱ्यांबरोबर नात्याची वीण गुंफणारा ‘भोवरा’
By admin | Updated: October 22, 2016 01:39 IST