घोटी : इगतपुरी तालुक्याची पाण्याची तहान भागविणाऱ्या व सिंचनाचे प्रश्न सोडविणाऱ्या दारणा नदीच्या उगमस्थानी असलेल्या दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असणारे भावली धरण शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास काठोकाठ भरून ओसंडून वाहू लागल्याने तालुक्यातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, गेल्या दीड महिन्यापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली असून, महत्त्वाच्या दारणातही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. भावलीचा पाणीसाठा दारणात सोडून पुढे जायकवाडीला सोडण्यात येतो. तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची मदार या धरणावर आहे. यामुळे मागील काही महिन्यात या धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग केल्याने या धरणाने तळ गाठला होता. दारणा नदीलगतच्या गावातील पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची भिस्त या धरणावर असल्याने सर्व जण हे धरण भरण्याच्या प्रतीक्षेत होते. शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास या धरणाच्या सांडव्यावरून पाणी उलटले. दारणा धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. (वार्ताहर)
भावली ओव्हरफ्लो
By admin | Updated: July 24, 2016 21:41 IST