नाशिक : लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी..एवढ्या जगात माय मानतो मराठी...मराठी भाषेचे वर्णन करावे तेवढे कमीच. जिल्ह्यात सोमवारी मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. शाळा, महाविद्यालयांमध्ये व्याख्यान, विद्यार्थ्यांची रॅली यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.येवला : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख डॉ. भाऊसाहेब गमे होते. यावेळी बोलताना प्रभाकर झळके यांनी ज्ञानेश्वर-तुकारामांपासून तर केशवसुत, गडकरी, कुसुमाग्रज, पाडगावकर आणि हल्लीच्या लिहिणाऱ्या अनेक साहित्यिकांनी मराठी साहित्य समृद्ध केलेले असून, ते वाचल्याने आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध होत जाते. ज्ञान संपादनासोबतच मनोरंजनही मराठी साहित्यातून मोठ्या प्रमाणावर होते असे त्यांनी सांगितले. त्यांनी मराठी भाषेची ऐतिहासिक वाटचाल आणि विकास या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संत साहित्य, पंत साहित्य, शाहिरी साहित्य, आधुनिक मराठी साहित्य याचा त्यांनी आढावा घेतला. त्यांनी बोलीमधून येणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार, विविध शब्दांच्या उत्पत्ती व त्यातून निर्माण होणारे विनोद यांचे खुमासदार वर्णन केले. इंग्रजी शब्दांना मराठीत असणारे पारिभाषिक शब्द व त्याच्या वापरातून निर्माण होणारे विनोद यांचेही रसभरीत वर्णन त्यांनी केले.ओझरटाऊनशिप : येथील ओझर विकास संस्थेच्या विश्वसत्य कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच प्रा. एस.ए. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्र मात मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रत्नप्रभा पगारे यांनी कुसुमाग्रजांविषयी माहिती सांगून कुसुमाग्रजांसारखा ध्रुवतारा बनण्याचे स्वप्न विद्यार्थ्यांनी बघून ते प्रत्ययास आणण्याचे प्रयत्न करावे, नवनवीन साहित्याचे वाचन करून स्वत:तील साहित्यकाला समाजा समोर आणावे/ कविता, कथांचे लेखन करावे, असे आवाहन करून भाषा हे ज्ञान मांडण्याचे माध्यम असल्याचे सांगितले. (लोकमत ब्युरो)
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
By admin | Updated: February 28, 2017 00:40 IST