नाशिक : मराठवाड्यासाठी पाणी सोडल्यानंतर नाशिकमध्ये सुरू झालेल्या आंदोलनाच्या वेळी गायब असलेल्या भाजपा आमदारांनी मंगळवारी आपण याविषयावर संवेदनशील असून, नाशिककरां-बरोबरच असल्याचा दावा केला. मात्र त्याचवेळी महापौरांनी आमंत्रण दिले नाही म्हणून पाणीप्रश्नी बैठकीला आणि आंदोलनात सहभागी झालो नाही, असा केलेला दावा त्यांच्याच अंगलट आला. माध्यम प्रतिनिधींनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर भाजपाची भंबेरी उडाली. आणि मित्रपक्ष शिवसेना आणि विरोधकांवर दुगण्या देत राजकारण करू नये, असा सल्ला देत हा विषय थांबविण्याचे आवाहन करण्यात आले.मराठवाड्याला दारणा आणि गंगापूर धरणातून पाणी सोडण्याच्या वेळी चुकीची माहिती सादर करण्यात आल्याने उच्च न्यायालयाने पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर तातडीने रात्रीच्या वेळी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गेल्या रविवारपासून मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पाणी पेटवले असून, आंदोलने होत आहेत. परंतु भाजपाच्या शहरातील तिन्ही आमदारांचा किंवा पदाधिकाऱ्यांचा यात कोणताही समावेश नसल्याने तिन्ही आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जाग आलेल्या भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप यांनी शुक्रवारी आणि शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून शहरात भाजपाविषयी शहरात वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न सुरू असून, भाजपाच्या आमदारांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहरातून तीन भाजपा आमदार निवडून आल्याने अन्य पक्षांना ते सहन झालेले नाही. त्यातून महापालिकेत यंदाच्या पंचवार्षिकमध्ये दुसऱ्या टर्ममध्ये विरोधकांची अनिष्ट युती झाली असून, त्यातून हेच घडणार होते, असे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी सांगितले.आमदार देवयानी फरांदे यांनी मराठवाड्याला समन्यायी पद्धतीने पाणीवाटपाचा निर्णय हा राज्यात कॉँग्रेस आघाडी सरकार असताना झाला. त्यावेळीच जलनियामक प्राधिकरणाला संवैधानिक अधिकार मिळाले. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे वजनदार मंत्री होते, त्यावेळी या सर्व प्रकाराला विरोध का झाला नाही, असा प्रश्न केला. प्राधिकरणाला पाणी सोडण्याचे न्यायिक अधिकार असल्याने जलसंपदामंत्री अथवा शासन त्यात हस्तक्षेप करू शकले नाही. आळंदी धरणाला गंगापूर धरणाच्या समूहात दाखविले, धरणातील मृत साठाही जिवंत दाखविल्यामुळे गोंधळ झाल्याचे सांगतानाच प्रा. फरांदे यांनी या सर्वबाबतीत दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.जोड
पाणीप्रश्नावर भाजपाची भंबेरी !
By admin | Published: November 06, 2015 11:02 PM