नाशिक : शासन अनुदानातून भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या वाहनतळातील जागेत साकारणाºया प्रस्तावित शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाबाबतचा वाद आजी-माजी आमदारांमध्ये धुमसत असतानाच आता या वादात भाभानगर परिसरातील स्थानिक नागरिकांनी उडी घेतली असून, सदर रुग्णालय उभारण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. भाभानगर ज्येष्ठ नागरिक बहुद्देशीय सेवा समितीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देत प्रस्तावित महिला रुग्णालय अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे.शंभर खाटांच्या महिला रुग्णालयामागील शुक्लकाष्ठ काही संपलेले नाही. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर भाजपाच्या नगरसेवक सुप्रिया खोडे यांच्या प्रस्तावानुसार भाभानगरच्या जागेचा ठराव तातडीने करून देण्यात आल्याने आमदार फरांदे यांची सरशी झाली असली तरी आता या रुग्णालयाविरोधात स्थानिक नगरसेवकांनीच विरोध दर्शविल्याने रुग्णालयावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लटकले आहे. भाभानगर परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन सदर रुग्णालय साकारण्यास आक्षेप घेतला आहे. महापालिका आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, भाभानगर परिसरात अगोदरच नऊ ते दहा रुग्णालये आहेत आणि महिला रुग्णालयाबाबत स्थानिक नागरिकांनी कुठेही मागणी केलेली नाही. सदर रुग्णालयासाठी अपेक्षित असलेल्या पर्यावरणीय व तांत्रिक निकषांची पूर्तता भाभानगरच्या जागेत होऊ शकत नाही. गायकवाड सभागृह हे सर्वाधिक आसनक्षमतेचे सभागृह असून, रुग्णालयासाठी अपेक्षित असलेली शांतता सभागृहातील ध्वनिक्षेपण व्यवस्थेमुळे उपलब्ध होऊ शकणार नाही. प्रस्तावित जागेला लागूनच दहा लाख लिटर्स क्षमतेचा जलकुंभ आहे. रुग्णालय झाल्यास तेथील अस्वच्छतेमुळे पाणी प्रदूषणाचा धोका उद्भवू शकतो. गायकवाड सभागृह आणि महिला रुग्णालयामुळे वाहनतळाची समस्या भेडसावणार आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. परिसरातील लाखो रुपये खर्चून तयार केलेला जॉगिंग ट्रॅकही त्यामुळे बंद होणार आहे. प्रतिकूल बाबी विचारात न घेता रुग्णालय उभारणीचा अट्टहास केला जात आहे. याच ठिकाणी वृक्षलागवडही झालेली आहे. रुग्णालय उभारताना वृक्षतोड बेकायदेशीर ठरणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून रुग्णालय अन्य ठिकाणी प्रस्तावित करावे, अशी मागणी निवेदनात समितीचे अध्यक्ष पी. व्ही. क्षीरसागर यांनी केली आहे.
महिला रुग्णालयाविरोधात भाभानगरवासीय एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 14:47 IST
आयुक्तांना निवेदन : अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी
महिला रुग्णालयाविरोधात भाभानगरवासीय एकवटले
ठळक मुद्देमहिला रुग्णालयाबाबतचा वाद आजी-माजी आमदारांमध्येवादात भाभानगर परिसरातील स्थानिक नागरिकांनी घेतली उडी महिला रुग्णालयामुळे वाहनतळाची समस्या भेडसावणार