नाशिक : कोरोनाचा विषाणू जसे आपले स्वरूप बदलतो, तसेच डेंग्यूचा व्हायरसदेखील त्याचे स्वरूप बदलत आहे. त्यामुळे वाढत्या डेंग्यू रुग्णांमध्ये ही व्हायरसची वेगळी रूपे आणि लक्षणे दिसून येत आहेत. काही रुग्णांना तर प्लेटलेट्सचे प्रमाण कायम असूनही डेंग्यू तर काहींना ताप नसूनही डेंग्यू झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे सर्वच नागरिकांनी घराच्या परिसरात स्वच्छता, डासांची वाढ रोखणे, झोपताना आणि घराबाहेर पडताना विशेष दक्षता घेणे अत्यावश्यक झाले आहे.
‘डेंग्यू व्हायरस’ या आरएनए प्रकारच्या विषाणूमुळे डेंग्यू हा आजार होतो. हा विषाणू रुग्णाच्या रक्तात सर्वदूर संचार करीत असतो. अशा व्यक्तीला जेव्हा इडिस डासाची मादी चावते, त्या वेळेला हे जंतू तिच्या शरीरात प्रवेश करतात. मादीमध्ये ८ ते ९ दिवस या जंतूंची प्रचंड वाढ होते- डासाला त्यापासून काहीही अपाय होत नाही. अशी मादी जेव्हा पुढील निरोगी व्यक्तीला चावते त्या वेळेला तिच्या लाळेतून हे विषाणू पुढील व्यक्तीमध्ये संक्रमित होतात आणि त्याला डेंग्यूची लागण होते. डास चावल्यापासून डेंग्यूची प्राथमिक लक्षणे दिसायला ४ ते ७ दिवस लागतात. विशेषत्वे डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या वाढत्या प्रमाणामुळे अनेकांना रुग्णालयात ॲडमिट करण्याचीही वेळ येत आहे. काही लोकांना अंगावर पुरळ उठते, ती गोवरासारखी दिसते आणि त्यानंतर ताप उतरू लागतो.
इन्फो
ताप नसतानाही पॉझिटिव्ह
डेंग्यूची लक्षणे ही इतर अनेक सर्वसामान्य आजारांप्रमाणेच असल्याने सुरुवातीला फ्लू, सर्दी, मलेरिया, टायफाॅइड आदींसारखाच तो वाटतो, म्हणून डेंग्यूची साथ असताना किंवा शंका आल्यास विशिष्ट रक्त चाचण्या कराव्या लागतात. काही उदाहरणांमध्ये तर ताप नसतानाही डेंग्यूने रुग्ण बाधित आढळून येतो. त्यामुळेच अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.
इन्फो
प्लेटलेट्स कमी नाही तरी बाधित
डेंग्यूच्या गंभीर लक्षणांमध्ये प्रामुख्याने कातडीवर रक्ताळलेले पुरळ, रक्तस्राव, झोप जास्त येणे, भ्रम, दम लागणे, सतत उलट्या, पोटदुखी, सूज, शरीर थंड पडणे, रक्तदाब कमी होणे या बाबींचा त्यात समावेश आहे. काहींच्या प्लेटलेट्स कमी झालेल्या नसल्या तरी त्यांना डेंग्यूची बाधा झाल्याचेही काही प्रकार नजरेस येत आहेत.
इन्फो
खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी
जिल्ह्यातील खासगी रुग्णालये आणि खासगी लॅबमध्ये तर डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे गत दोन महिन्यांत किमान ९ हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील पेठ, त्र्यंबकेश्वर, तसेच नाशिक तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातही मोठ्या प्रमाणात चिकुनगुनिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरासह तालुक्यांमधील खासगी रुग्णालयेदेखील डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांनी ओसंडून वाहत आहेत.
कोट
जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधीसाठा उपलब्ध आहे. मात्र, नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. डासांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
-डॉ. किशोर श्रीवास, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक