राजीव मुळ्ये - बेळगाव तब्बल ५५ वर्षांनी होत असलेले नाट्य संमेलन, त्यानिमित्ताने सीमाभागात वास्तव्याला आलेली मराठी रंगभूमी आणि चित्रसृष्टीतील लाडके तारे, सादरीकरणासाठी सजलेले पाच रंगमंच अशा भारलेल्या वातावरणात बेळगावनगरी नांदीच्या सुरावटीसाठी आतुर झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलेली भव्य नाट्यनगरी आणि स्मिता तळवलकर यांचे नाव दिलेला प्रशस्त रंगमंच उद्या (शनिवार) हजारोंच्या गर्दीने ओसंडून वाहणार आहे. या देखण्या मुख्य शामियानात साडेतीन हजारांहून अधिक प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लालचुटुक जाजम अंथरलेला हा शामियाना खास पाहुण्यांच्या प्रतीक्षेत आहे. स्मिता तळवलकर रंगमंचावर अत्यंत आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. मोरांच्या प्रतिकृती असलेली मोती रंगाची मखर गडद निळ्या बॅकड्रॉपवर उठून दिसत आहे. मुख्य रंगमंचावर नटराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या आहेत. तसेच दोन्ही बाजूंना बेळगावच्या मुख्य वाचनालयाच्या क्लॉक टॉवरच्या प्रतिकृती उभारल्या आहेत.मंडपात सर्वत्र आकर्षक झालरी लावण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खास बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत याच शामियानात सकाळी दहा वाजता संमेलनाची नांदी होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडामंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
नांदीच्या सुरावटीसाठी बेळगाव आतुर....
By admin | Updated: February 7, 2015 00:05 IST