सिडको : डॉक्टर असल्याचे भासवत नामांकित रुग्णालयांत अंगावर अधिक दागिने असणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्याचा बहाणा करीत त्यांना भूल देऊन त्यांच्या अंगावरील दागिने लंपास करणाऱ्या भामट्यास सिडको येथे नाशिक व तामिळनाडूच्या पोलिसांनी ताब्यात घेतले़राजेश अर्जुन भारसाकळे (२८) सध्या राहणार सिडको, कामटवाडे येथील कोमल रो-बंगलो, तर कर्नाटक राज्यातील हुबळी येथील मूळचा तो रहिवासी आहे़ दहावी नापास असलेल्या संशयिताचे आई व वडील हे दोघेही कर्नाटकात डॉक्टर होते़ परंतु दोघांचेही निधन झाले आहे़ राजेश हा प्रथमपासून चोऱ्या करत असे़ तामिळनाडूत एका मोठ्या रुग्णालयात भूल देऊन चोरी करण्याचा प्रयत्न करताना सीसीटीव्हीच्या फु टेजमध्ये तो आढळून आला होता. त्यानुसार त्याचा तपास तामिळनाडू पोलीस करीत होते़ तामिळनाडू पोलिसांना हा आरोपी नाशिक येथे राहत असल्याची खबर मिळाली होती़याबाबत तामिळनाडू पोलिसांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला होता़ आज पोलीस उपआयुक्त डॉ़ डी़ एस़ स्वामी, अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, उपनिरीक्षक किरण मतकर व तामिळनाडू पोलिसांनी त्यास त्याच्या घरी सापळा रचून पकडले़ या भामट्याने तामिळनाडूसह विविध राज्यांत वेगवेगळ्या गुन्ह्यांत सुमारे २५ लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचे पोलिसांनी सांगितले़ पोलीस तपासात इतर गुन्हे उघड होण्याबरोबरच काही लाखांच्या सोन्याची चोरी उघड होणारअसल्याचे पोलिसांनी सांगितले़ (वार्ताहर)