राजेश पवार भऊरकेंद्र शासनाकडून कांद्याचे निर्यातमूल्य शून्य करूनही बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत सध्या भाव मिळत नसून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.उन्हाळी कांद्याच्या हंगामात कांद्याचे निर्यातमूल्य वाढलेले असताना ही कांद्याला चांगला बाजारभाव मिळत होता. पावसाळी पोळ व रांगडा कांद्यालाही कमीत कमी १५ ते २० रुपये याप्रमाणे चांगला बाजारभाव मिळून दोन पैसे आपल्या पदरी पडतील या अपेक्षेत कांदा उत्पादकांनी अनेक अडीअडचणींवर मात करीत पावसाळी कांद्याची लागवड केली. लागवडीपूर्वी काळे उळे (बियाणे) महाग असूनही उत्पादकांनी त्याची उपलब्धता करुन रोपे टाकली. रोपे उगवल्यापासून लागवडीपर्यंत नेहमीचेच ढगाळ हवामान, बेमोसमी पावसाची शक्यता, खाद्य, किटकनाशके, बुरशीनाशके यांच्या वाढलेल्या किमती, पाण्याची व मजुरांची टंचाई या संकटावर मात करीत कांदा उत्पादकांनी पीक सांभाळले. गत उन्हाळी हंगामात कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे कांदा लागवड, निंदणी, खुरपणी, कांदे काढणी, चाळीत साठवणूक करुन विक्रीसाठी निवड करणेपर्यंत मजुरांना वाढीव २०० ते २५० रुपये रोज कांदा उत्पादकांना द्यावा लागत होता. सध्या पावसाळी लाल कांद्याला बाजार समितींमध्ये ३ रुपयांपासून १० रुपयांपर्यंत सरासरी ७ ते ८ रुपये बाजारभाव मिळत आहे.गत दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती, डाळिंबावरील तेल्या रोग, बेमोसमी पाऊस व गारपिटीने झोडपलेल्या शेतकऱ्यांनी उसनवारीने, बॅँकेकडून कर्ज काढून, उधारीने पावसाळी लाल कांद्याची लागवड केली आहे. सध्याचा बाजारभाव बघता कांदा उत्पादकांचा अपेक्षाभंग होऊन कांद्याच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत कांदा विक्री करुन हाती काहीच शिल्लक राहत नाही. बॅँकेचे कर्ज, खत, खाद्य, फवारणीची उधारी फेडायची कशी ? कुटुंब, संसाराचा गाडा चालवायचा कसा? असा प्रश्न कांदा उत्पादकांच्या समोर निर्माण झाल्याचे सत्यचित्र आहे. उशीरा लागवड केलेल्या कांद्याची पाण्याअभावी अतिशय खराब परिस्थिती असून काही ठिकाणी अर्धवट अवस्थेतील कांद्याचे पीक सोडावे लागणार आहे. काही ठिकाणी फक्त लहान गोल्टी आकाराचा कांदा हाती येणार आहे.शासनाचा शेती व शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन, शेतीविषयी धोरण हे शेती हिताचे दिसत नसल्यामुळे शेतीचा व्यवसाय तोट्यात जाऊन शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेती पिकाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे घरातील आर्थिकस्त्रोत कमी होऊन तरुणांची अवस्था ‘घरात आई जेवायला देत नाही आणि बाप भीक मागू देत नाही’ अशी झाली आहे.(वार्ताहर)
कांद्याला भाव नसल्याने बळीराजा हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2016 23:08 IST