राज ठाकरे : महापालिकेच्या कार्यक्रमात केली घोषणानाशिक : मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा प्रश्न अद्यापही भिजत पडलेला असताना मनसेने मात्र आपल्या हाती असलेल्या नाशिक महापालिकेच्या माध्यमातून गंगापूररोवरील पंपिंग स्टेशन येथे उभारण्यात येणारे शिवकालीन पुरातन वस्तूंचे संग्रहालय हेच बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक असेल, हे स्पष्ट करत बाळासाहेबांप्रती आपला श्रद्धाभाव व्यक्त केला आहे. नाशिक महापालिकेच्या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या स्मारकाची घोषणा केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाचा वाद उफाळून आला होता. मुंबई महापालिकेने रेसकोर्सवर बाळासाहेबांच्या स्मारकाची संकल्पना मांडल्यानंतर त्यालाही विरोध झाला होता. त्यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही या वादात उडी घेत, लोकोपयोगी प्रकल्पांच्या माध्यमातून बाळासाहेबांचे स्मारक उभे राहावे, अशी सूचना केली होती. त्याचवेळी नाशिक येथे गंगापूररोडवरील पंपिंग स्टेशनच्या जागेत बाळासाहेबांचे स्मारक होण्यासाठी शिवसेनेने आंदोलन केले होते आणि प्रवेशद्वारावर तसा फलकही उभा केला होता. नंतर उद्धव ठाकरे यांनीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपण मागणी करण्याऐवजी महापालिकेला स्वत:हून स्मारक उभारू द्या, असे सांगत सबुरीचा सल्ला दिला होता. त्यानंतर स्मारकाचा प्रश्न थंडावला होता. दरम्यान, महापालिकेत मनसे सत्तारूढ झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पंपिंग स्टेशनच्या जागेची पाहणी करत तेथे शिवकालीन वस्तूंचे संग्रहालय उभारण्याची संकल्पना मांडली आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी त्याबाबत चर्चाही करत वस्तुसंग्रहालयाला चालना दिली. तीन महिन्यांपूर्वी बाबासाहेबांच्या सुपुत्रासमवेत राज यांनी पाहणी करत प्रकल्पाला गती दिली. मंगळवारी नाशिक महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मोबाइल अॅप्सच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना राज ठाकरे यांनी सदर वस्तुसंग्रहालयाची माहिती दिली आणि सदर वस्तुसंग्रहालय हेच बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक असेल, असे जाहीर केले. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक म्हटल्यावर तेथे शस्त्रे दिसलीच पाहिजे, असेही सांगत त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संग्रहातील शिवकालीन शस्त्रांस्त्रांचे संग्रहालय नाशिकच्या लौकिकात भर टाकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वस्तुसंग्रहालय बनणार बाळासाहेबांचे स्मारक
By admin | Updated: September 16, 2015 00:08 IST