नाशिक : सेंट्रल गोदावरी कृषक सेवा संस्थेच्या संचालकांसह शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत साखळी उपोषणापुढे बॅँक व्यवस्थापनाने माघार घेत सर्व मागण्या मान्य केल्याने उपोषण मागे घेण्यात आले. संचालक दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले होते. सेंट्रल गोदावरी कृषक सेवा संस्थेला सेंट्रल बॅँक आॅफ इंडियाच्या सातपूर शाखेतून कर्ज पुरवठा केला जातो; मात्र बॅँक व्यवस्थापनाने कृषक संस्थेला कर्ज पुरवठा करण्यास नकार दिल्याने संस्थेच्या सर्वसाधारण सभेत बॅँकेविरोधात उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उपोषण पुकारण्यात आले होते; मात्र बॅँकेने कृषक संस्थेच्या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जाणार असल्याचे आश्वासन दिल्याने साखळी उपोषण मागे घेण्यात आले आहे. यावेळी बॅँकेचे व्यवस्थापक आखौरी यांनी कृषक संस्थेच्या संचालक मंडळाला लेखी आश्वासनांची प्रत दिली आहे. यावेळी पाटील यांच्यासह मधुकर खांडबहाले, अनिता चव्हाण, गोकुळ काकड, पंडित कातड, तानाजी पिंगळे, शीला पाटील, रामदास पिंगळे, पुंजाराम थेटे, दौलत पाटील, हिरामण बेंडकोळी, अरुण पाटील, ज्ञानेश्वर वाघ, रामदास चव्हाण, विष्णू घुगे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कृषक सेवा संस्थेचे उपोषण मागे
By admin | Updated: September 29, 2015 23:03 IST