नाशिक : मध्यवर्ती शाखेच्या धर्तीवर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीनेही यंदाच्या वर्षीपासून प्रथमच स्थानिक रंगकर्मींसाठी पुरस्कार सुरू करण्यात आले असून, या पुरस्कारांची घोषणा आज पत्रकार परिषदेत करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते विवेक पाटणकर, ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकर यांच्यासह सहा ज्येष्ठ रंगकर्मींना येत्या मराठी रंगभूमी दिनाला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.दोन हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप असणार आहे. येत्या गुरुवारी (दि. ५ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. नाशिक शाखेच्या वतीने प्रथमच स्थानिक रंगकर्मींसाठी पुरस्कार सुरू केले जात असून, यापुढे दरवर्षी ते देण्यात येणार आहेत. या पुरस्कार निवड समितीत ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर, विवेक गरुड, मधुकर झेंडे, मुरलीधर खैरनार, धर्मेंद्र चव्हाण यांचा समावेश होता. दरम्यान, नाशिक महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रंगभूमीदिनाच्या कार्यक्रमात शहरातील दिवंगत रंगकर्मींच्या कार्याचा गौरवही केला जाणार आहे. यावेळी अनंत कुबल, दादा नाडगौडा, मनोहर सहस्रबुद्धे, वसंत पेठे, अनिल दीक्षित, शाहीर गजाभाऊ बेणी, डॉ. रामदास बरकले, राजीव पाटील आदिंसह सुमारे ३१ दिवंगत रंगकर्मींच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार केला जाणार आहे. दिवंगतांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमात प्रातिनिधिकरीत्या पणती प्रज्वलित केली जाणार आहे. या पुरस्कारांच्या निमित्ताने विशेष स्मरणिकाही प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष शाहू खैरे, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, महेश डोकफोडे आदि उपस्थित होते.
पुरस्कार विजेते असे...स्व. दत्ता भट स्मृती (अभिनय, पुरुष) : विवेक पाटणकरस्व. शांता जोग स्मृती (अभिनय, स्त्री) : नीलकांती पाटेकरस्व. प्रभाकर पाटणकर स्मृती (दिग्दर्शन) : रवींद्र ढवळेस्व. बापूसाहेब काळसेकर स्मृती (रंगभूषा) : नारायण देशपांडेस्व. रावसाहेब अंधारे स्मृती (नेपथ्य) : अमरसिंग भोईर४स्व. गिरिधर मोरे स्मृती (प्रकाशयोजना) : श्रीकांत हिंगणे