नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या ‘विशाखा’ काव्यसंग्रहाच्या नावाने काव्य लेखनासाठी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी शनिवारी (दि. २५) केली. यावर्षीचे पुरस्कार डॉ. योगिनी सातारकर, मोहन कुंभार आणि विष्णू थोरे यांना रविवारी (दि. २६) कालिदास कलामंदिर येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रविवारी (दि. २६) संध्याकाळी सहा वाजता ‘बोलू कवतिके’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. २०१६ सालाकरिता देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी डॉ. योगिनी सातारकर - पांडे (नांदेड) यांच्या ‘जाणिवांचे हिरवे कोंब’ या काव्यसंग्रहासाठी प्रथम पुरस्कार, मोहन कुंभार (सिंधुदुर्ग) यांच्या ‘जगण्याची गाथा’ या काव्यसंग्रहास द्वितीय तर विष्णू थोरे (नाशिक) यांच्या ‘धुळपेरा उसवता’ या काव्यसंग्रहास तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. विशाखा काव्यसंग्रह पुरस्कारासाठी प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक १५ हजार रुपये आणि तिसरे पारितोषिक १० हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे. बोलू कवतिके या सांस्कृतिक कार्यक्रमात ज्येष्ठ गायक रवींद्र साठे, अनुराधा मराठे, योगीता गोडबोले, श्रीरंग भावे, अशोक काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, प्राजक्ता राज - अत्रे या नृत्य सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी संगीत संयोजन केदार परांजपे करणार असून, तुषार दळवी, मधुरा वेलणकर, प्रवीण जोशी हे अभिवाचन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर हे असून, प्रमुख पाहुणे म्हणून कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)