नाशिक : मनसेचे आमदार वसंत गिते यांच्या नाराजीला कारणीभूत ठरलेले शहर संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांच्याकडे नाशिकशिवाय मराठवाड्याची जबाबदारी देण्यात आली आहे. वरिष्ठ पद देऊन स्थानिक पातळीवरील सहभाग कमी करण्याच्या व्यूहरचनेचा हा एक भाग असून, इंग्रजीत त्याला ‘किकिंग अप’ म्हटले जाते. हाच प्रकार अभ्यंकरांच्या बाबतीतही घडला आहे. अभ्यंकर यांना मराठवाड्याच्या दौऱ्यावर सोमवारपासूनच जाण्यास सांगण्यात आले आहे. तब्बल वीस दिवसांचा हा दौरा असून, त्या माध्यमातून नाशिकचे वातावरण निवळण्यास मदत होईल, असे सांगण्यात येत आहे.नाशिकमधील मनसेत बेबनाव, सत्तेचे केंद्रीकरण आणि पालिकेतील सुमार कामगिरी या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये शहराध्यक्षपदी समीर शेटे यांच्याऐवजी राहुल ढिकले यांना नियुक्त केले आणि शहर संपर्क अध्यक्षपदी मुंबईचे अविनाश अभ्यंकर यांना नियुक्त केले. अभ्यंकर यांनी त्यानंतर मनसे नगरसेवकांच्या प्रभागात दौरे केले, कामांच्या याद्या केल्या, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. परंतु हे सर्व करताना स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याचे निमित्त झाले आणि रोष वाढायला सुरुवात झाली. आमदार वसंत गिते यांच्या दृष्टीनेदेखील हे नाराजीचे कारण ठरले. त्या पार्श्वभूमीवर अभ्यंकर यांच्याकडे नाशिकबरोबरच मराठवाडासारख्या मोठ्या प्रादेशिक विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणायला नाशिक शहरापेक्षा कैकपटीने मोठी जबाबदारी देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांना मराठवाड्यात पाठवून नाशिकमधील गितेंसारख्या काही पदाधिकाऱ्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आले असल्याचे दिसत आहे.
अविनाश अभ्यंकरांचे किकिंग अप!
By admin | Updated: July 8, 2014 00:57 IST