अंदरसूल : शासनाच्या नियमनमुक्ती धोरण अमलबजावणीवरून गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव ठिकठिकाणी सुरू करण्यात आले. मात्र लिलावासाठी कांदा गोणीतूनच आणावा, अशा आग्रही भूमिकेवर व्यापारी ठाम असल्याने कोंडी झालेल्या संतप्त शेतकऱ्यांसह शिवसेनेने आक्र मक होत शुक्र वारी सकाळी ११ वाजता अंदरसूल उपबजारातील लिलाव बंद पाडत व्यापारी धोरणाचा निषेध केला. आधीच दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांकडे थोडाफार असलेला कांदा विकल्याने दोन पैसे हाती येतील यातूनच पिकांच्या मशागतीसाठी खते व इतर खर्च याचा ताळमेळ बसेल असे गणित असताना, शासन व व्यापारी यांच्या मनमानी कारभाराने शेतकरी अडचणीत आला आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे हतबल झालेला शेतकरी पूर्वीच्या पद्धतीनेच कांदा लिलाव सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका मांडत आहे, तर दुसरीकडे मोकळा कांदा लिलावास व्यापारी तयार नसून गोणीतच कांदा आणावा यावर ठाम असल्याने नाशवंत कांदा पिकाचे काय करावे ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावत असल्याने शेतकरी चांगलाच कोंडीत सापडला आहे. गोणीसाठी अवांतर खर्च करूनही कांदा मातीमोल भावाने विकला जात असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. येवला पाठोपाठ शुक्रवारी अंदरसूलला लिलाव बंद पाडण्यात आला. या आंदोलनात शिवसेनेचे येवला तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, भगीनाथ थोरात, अमोल सोनवणे, नारायण देशमुख, माजी सरपंच पुंडलिक जाधव, जगन देशमुख, सागर चाकणकर, नागनाथ तांदळे, पोपट धनगे आदिंसह परिसरातील शेतकरी व शिवसैनिक सहभागी झाले होते.
अंदरसूलला कांदा लिलाव पाडले बंद
By admin | Updated: July 29, 2016 22:35 IST