नाशिक : राज्यात १५ जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून राज्यातील शाळा मंगळवारपासून ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. मात्र शाळांमध्ये विद्यार्थी येणार नसले तरी शिक्षकांना साळेत उपस्थित राहवे लागणार आहे. यात अकरावीसह पहिली ते नववीपर्यंचे ५० टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तर दहावी व बारावीच्या शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी १०० टक्के उपस्थित राहण्याच्या सूचना शिक्षण संचालक व जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहण्यासंदर्भात शिक्षकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षण ऑनलाइन सुरू राहणार असेल तर शिक्षकांनी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहून काय साध्य होणार आहे ? असा सवाल शिक्षकांकडून केला जात आहे. त्याचप्रमाणे कोविडसेवेत असलेल्या शिक्षकांना अजूनही कार्यमुक्त केलेले नाही. त्यामुळे शिक्षक शाळेत कसे उपस्थित राहणार? असा प्रश्न शाळा मुख्याध्यापकांना पडला आहे. तर दहावी व बारावीच्या बाबतीत १०० टक्के उपस्थितीमुळे शिक्षक एकत्र येण्याचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती शिक्षकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रवेशप्रक्रिया आणि अन्य शैक्षणिक कामकाजासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहणे अवाश्यक असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
---
जिल्ह्यातील एकूण शाळा - ५६२६
जि. प. शाळा - ३२६६
अनुदानित शाळा - ८७५
विनाअनुदानित शाळा -२८९
--
शिक्षक - ११,६५५
शिककेत्तर-२५२३
---
शिक्षकांना कोविड सेवेतून कार्यमुक्त केलेलेच नाही. कोविड सेवेतील शिक्षक उपलब्ध होत नसल्याने नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिक्षकांना उपलब्ध साधनांच्या आधारे ऑनलाइन, ऑफलाइन व्हिडिओ तयार करून अथवा थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्या अभ्यासासाठी मार्गदर्शन करावे लागते. त्यामुळे मनुष्यबळालाची गरज भासते, परंतु शिक्षक सेवामुक्त होत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याने शिक्षकांना कोविड सेवा कार्यमुक्त करण्याची गरज आहे.
-नंदलाल धांडे, अध्यक्ष, खासगी प्राथमिक शाळा शिक्षक संघ
--
ऑनलाइन शिक्षण सुरू असताना प्रत्यक्ष शाळेत उपस्थितीची गरज नाही, शाळेत शिक्षक एकत्र येऊन संसर्गाचा धोका आहेच, त्यामुळे प्रशासकीय कामकाज व दहावी व बारावीचे निकाल तयार करण्यासारख्या कामांसाठी आवश्यकतेनुसार शिक्षकांना उपस्थिती अनिवार्य करून इतर शिक्षकांना शाळा सुरू होईपर्यंत घरून शिकविण्याचा पर्याय उपलब्ध देत उपस्थितीचे नियम शिथिल करण्याची गरज आहे.
- मोहन चकोर, अध्यक्ष, नाशिक शहर माध्यमिक शिक्षक संघ.
----
संचालकांचे पत्र काय?
- शिक्षण संचालकांनी उपस्थिती संदर्भात विभागीय शिक्षण उसंचालकांसह प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना पत्रातद्वारे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या सूचनांसह अकरावीसह पहिली ते नववीच्या ५० टक्के, तर दहावी व बारावीच्या १०० टक्के शिक्षकांनी उपस्थिती राहण्याच्या सूचना केल्या असून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही १०० टक्के उपस्थितीच्या सूचना केल्या आहेत.
जि. प.चे पत्र काय?
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी पत्र काढून मुख्याध्यापकांना शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीसंदर्भात पत्र काढले आहे, तर माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पाचवी ते नववी व अकरावीच्या ५० टक्के आणि दहावी व बारावीच्या शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी १०० टक्के उपस्थितीसंदर्भात सूचना केल्या आहेत.
----------
शिक्षण संचालकांकडून प्राप्त सुचनांनुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून संबधित शाळांच्या मुख्याध्यापकांना शिक्षकांच्या उपस्थितीसंदर्भात पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार अकरावीसह पहिली ते नववीचे ५० टक्के शिक्षक उपस्थित राहतील, तर दहावी व बारावीचे १०० टक्के उपस्थित राहणार असून, शिक्षकेत्तर कर्मचारी १०० टक्के उपस्थित राहतील, अशा सूचना देण्याच आल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.