दिंडोरी तालुक्यात कोरोनाच्या लाटेत सर्वप्रथम मातेरेवाडी येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला व त्यात ग्रामसेवक यांचाही मृत्यू झाला. त्या पाठोपाठ चिंचखेड, खेडगाव,तिसगाव, सोनजांब, वणी, बोपेगाव, पालखेड, म्हेळुस्के, करंजवन, लखमापूर हे हॉटस्पॉट बनले. अन् गावोगाव मृत्यूचे तांडव सुरू झाले. शासनाने कडक निर्बंध घालत लॉकडाऊन सुरू केले, मात्र गेल्यावेळी प्रमाणे हे लॉकडाऊन तेवढे प्रभावी ठरले नाही. त्यात अनेक नागरिकांनी खासगी लॅबमध्ये तपासणी करत रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊनही प्रशासनास कळवले नसल्याची बाब प्रकर्षाने जाणवली. त्यामुळेच संसर्ग वाढत गेला व अनेकांचे जीव धोक्यात आले. शासनाने प्रत्येक आरोग्य केंद्रात मोफत तपासणी सुरू करूनही नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवत खासगी लॅबकडे जात आजार लपविण्याचा प्रयत्न केला. तसेच अनेक नागरिकांनी वेळीच उपचार न घेता आजार अंगावर काढल्याने अडचणी वाढल्या. आता तालुक्यातील परिस्थिती आटोक्यात येत असून, उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या हजारांच्या आत आली आहे. वणी, दिंडोरी, खेडगावसह शहरातील रुग्ण संख्या घटली आहे मात्र खेड्यात रुग्ण वाढत असल्याने चिंता कायम आहे. तसेच वेळेत उपचार न घेतलेले व आजाराला मानसिकरीत्या घाबरून उपचाराला साथ न दिलेल्या रुग्णांच्या मृत्यूच्या घटना सुरूच आहेत. प्रशासन वारंवार वेळेत तपासणी करा, उपचार करा, कोरोना बरा होतो सांगत नागरिकांना संसर्ग वाढू नये याची काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे.
दिंडोरीत निर्बंध पाळताना अनास्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:13 IST