सुरगाणा : ‘शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा’, यासारख्या घोषणा देत शुक्रवारी खोबळा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी व पालकांनी शैक्षणिक नुकसानीस जबाबदार असलेल्या मुख्याध्यापक, शिक्षकांचा निषेध करीत गटशिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तेथील मुख्याध्यापक एस.वाय. भोये यांचे निलंबन, तर अन्य एका शिक्षका-कडील मानव विकास कार्यक्रमाचे कामकाज काढून त्यांची बदली करून दुसऱ्या दोन शिक्षकांची त्वरित नियुक्ती करण्याचे ठोस आश्वासन गटशिक्षणा-धिकारी एस. पी. कुसाळकर यांनी दिल्यानंतर विद्यार्थी व पालकांनी मोर्चाची सांगता केली. जि.प. शिक्षण विभागातून मार्गदर्शन मागविल्यानंतर मुख्याध्यापक भोये यांचे निलंबन व दुसऱ्या दोन शिक्षकांची नियुक्ती करणार असल्याचे आश्वासन या वेळी कुसाळकर यांनी दिले. यावेळी जे.पी. गावित, मंदाकिनी भोये, उपसभापती इंद्रजित गावित, उत्तम कडू व पालक उपस्थित होते. (वार्ताहर)
आश्वासन : मुख्याध्यापकांसह दोन शिक्षकांवर कारवाई
By admin | Updated: August 9, 2014 00:56 IST