सटाणा : मागील भांडणाची कुरापत काढून एका तरुण शेतकऱ्यावर सहा जणांनी बेदम मारहाण करून कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार काल मंगळवारी तालुक्यातील खामलोण येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी सहा हल्लेखोरांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. खामलोण येथील विजय अभिमन धोंडगे (३१) हा शेतकरी त्याच्या शेतात जेसीबी मशीनने माती काम करत होता. यावेळी गावातील भाऊसाहेब देवराम धोंडगे व भाऊसाहेब पंडित धोंडगे या दोघांनी तू आमच्या भांडणात का पडतो, अशी कुरापत काढून झटापट केली. यातून आपली सुटका करून मित्राचा दुचाकीने घरी जात असताना खामलोण आडपांदीत पुन्हा भाऊसाहेब पंडित धोंडगे, भिका उखा धोंडगे, भाऊसाहेब देवराम धोंडगे, केशव रामचंद्र धोंडगे, युवराज पोपट धोंडगे, दीपक भिका धोंडगे यांनी दुचाकी अडवून विजय धोंडगे यांना बेदम मारहाण करून कपाळावर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात विजय धोंडगे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान, या मारहाणीत विजय यांच्या खिशातील २१३० रुपये तसेच आधार कार्ड, पॅनकार्ड गहाळ झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी सहा हल्लेखोरांविरुद्ध दंगलीचा व प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
खामलोण येथे शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:16 IST