बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे वीज वितरण केंद्रासह अस्वली स्टेशन शिवारातील वीज खांब वाकले असून, वाहिन्याही जमिनीला टेकल्या आहेत. परिणामी येथील शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला असून, वितरण कंपनी दुरु स्ती न करता कानावर हात ठेवत असल्याने शेतीची कामे रखडली आहेत.अस्वली स्टेशन येथील शेतकरी कचरू मुसळे व जयराम मुसळे यांच्या शेतातून वीज वितरण कंपनीची मुख्य वीजवाहिनी गेल्या असून, त्या लोंबकळत असून, जमिनीला टेकल्या आहेत. त्यामुळे शेतीची कामे रखडली आहेत. पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. जमिनीत पाणी असल्यामुळे आवणीच्या कामांना वेग येणार आहे; परंतु जीवघेण्या वीजवाहिन्यांमुळे शेतकरी शेतीत जाण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र आहे. तसेच चार ते पाच खांब अगदी वाकलेल्या स्थितीत आहेत. कधी ते कोसळतील याचा भरवसा राहिलेला नाही. गेल्या एक ते दीड वर्षापासून वीज वितरण कंपनीला पत्रव्यवहार करूनदेखील खांब उभे केलेले नाहीत. मनमानी कारभाराने शेतकऱ्यांना उत्तरे दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संंबंधितांनी या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
अस्वली स्टेशन शिवारातील वीजवाहिन्या धोकादायक
By admin | Updated: July 15, 2016 01:39 IST