शासकीय यंत्रणासह सभापती तळ ठोकून
कळवण : कळवण बाजार समितीच्या नाकोडा उपआवारात शेतकऱ्यांची अँटिजन चाचणी अहवाल तपासणी करून ट्रॅक्टर वाहनांना प्रवेश देण्यात आला. सकाळच्या सत्रात ३२२ ट्रॅक्टर वाहनातून आलेल्या कांद्याचा लिलाव करण्यात आला. लिलावाप्रसंगी कांदा व्यापारी, उत्पादक यांच्याकडून कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यात आले.
बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान उपआवारात कांदा लिलावाप्रसंगी व्यापारी व शेतकरी शासन निर्देशांचे पालन करतात किंवा नाही, हे पाहण्यासाठी सहायक निबंधक के. डी. गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, बाजार समिती सभापती धनंजय पवार लिलावाप्रसंगी काही काळ तळ ठोकून होते. कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार स्वतः लिलावाप्रसंगी व्यापारी व शेतकऱ्यांना कोरोनासंबंधी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन सातत्याने करीत होते. लिलावाच्या आदल्या दिवशी उपआवारात कोणीही ट्रॅक्टर लावू नये, अशी सूचना बाजार समितीच्या वतीने करण्यात आली होती. त्यामुळे सोमवारी सकाळी ३२२ ट्रॅक्टरांना प्रवेश देण्यात आला. कळवण बाजार समितीने अँटिजन चाचणी करण्याची व्यवस्था केली होती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर व्यापारी, बाजार समितीचे कर्मचारी मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियम पाळून लिलावत सहभागी झाले होते. ३२२ ट्रॅक्टर वाहनातून आलेल्या कांद्याला कमाल १९०० रुपये किमान १५५० तर सरासरी १६५० रुपये इतका बाजारभाव मिळाल्याचे सचिव रवींद्र हिरे यांनी सांगितले. गावठी सुपर कांद्याला १८०० ते १९०० रुपये तर सरासरी १५५० ते १६५० रुपये, गोलटा १००० ते २००० रुपये तर गोल्टी ६०० ते ८०० रुपये बाजारभाव मिळाला. यावेळी बाजार समितीचे संचालक सुनील महाजन, हेमंत बोरसे, कांदा व्यापारी मुरलीधर अमृतकार, दादा ठुबे, योगेश शिंदे, नितीन अमृतकार, जयवंत पगार आदी उपस्थित होते.