इंदिरानगर : वेळ : पहाटे चार वाजेची. ठिकाण : वैभव कॉलनी, राजीवनगर. येथील स्वामी समर्थ मंदिरातून दानपेटी घेऊन पळ काढणारे चोरटे येथील राधाकांत सोसायटीमध्ये राहणारे पोलीस नाईक गुलाब सोनार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला देत घरातून बाहेर पडले, मात्र सोसायटीचे प्रवेशद्वार उघडून ते मंदिराकडे पोहचण्याच्या आत चोरट्यांनी पळण्यास सुरुवात केली. सोनार यांनी प्रसंगावधान राखून चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, नियंत्रण कक्षाला कळविलेल्या माहितीमुळे अंबड पोलीस ठाण्याचे गस्त पथकाचे वाहन मदतीला आले व दानपेटी घेऊन पोबारा करणाऱ्या एका सराईत चोराच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी (दि.१२) पहाटे चार वाजेच्या सुमारास राजीवनगर येथील वैभव कॉलनीमधील स्वामी समर्थ मंदिराचा दरवाजा लोखंडी पहारीने तोडण्याचा व कुत्रे भुंकण्याचा आवाज आल्याने येथील राधाकांत अपार्टमेंटच्या क्रमांक एकच्या सदनिकेत राहणारे पोलीस नाईक गुलाब सोनार (४७) हे जागे झाले. त्यांनी घराची खिडकी उघडून बाहेर बघितले असता दोघे चोरटे मंदिराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. सोनार सोसायटीचे प्रवेशद्वार उघडून मंदिराकडे जाण्यासाठी निघाले असता त्यांना बघून चोरट्यांनी पळण्यास सुरुवात केली व दानपेटी आणि पहार फेकून दिली. दरम्यान, अंबड पोलीस ठाण्याचे गस्त घालणाऱ्या वाहनामध्ये पोलीस निरीक्षक मधुकर कड व कर्मचारी घटनास्थळी आल्याने सोनार यांनी त्यांना माहिती देत वाहनातून पाठलाग करण्यास सुरुवात केली आणि एका चोरट्याला ताब्यात घेण्यात पोलीस यशस्वी ठरले. संशयित सराईत गुन्हेगार राजू रामसिंग राजपूत (३६, रा. तेलंगवाडी फुलेनगर) यास पोलिसांनी अटक केली आहे. राजपूत याला सोबत घेत पोलिसांनी दानपेटी व पहार ज्या ठिकाणी फेकली तेथून जप्त केली आहे. (वार्ताहर)
दानपेटी घेऊन पळणाऱ्या चोरट्याला अटक
By admin | Updated: January 13, 2017 01:16 IST