नाशिक : करंजवण येथील गटार योजनेच्या कामाच्या मंजुरीचा प्रस्ताव मंजूर करून तो जिल्हा परिषदेत पाठविण्यासाठी ग्रामविस्तार अधिकाऱ्याकडून ४० हजार रुपयांची मागणी करून ती घेणारे दिंडोरीचे गटविकास अधिकारी राजाराम झगा मोहिते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले़ करंजवणच्या पंचशीलनगरमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे वस्तीचा विकास योजनेअंतर्गत ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी गटार योजनेचा प्रस्ताव तयार केला़ हा प्रस्ताव दिंडोरी पंचायत समिती कार्यालयात मंजुरीसाठी दाखल करण्यात आला होता़ गटार योजनेचा हा प्रस्ताव मंजूर करून तो नाशिक जिल्हा परिषदेच्या मंजुरीकरिता पाठविण्यासाठी गटविकास अधिकारी राजाराम झगा मोहिते यांनी ग्रामविस्तार अधिकाऱ्याकडे ४० हजार रुपयांची मागणी केली़n याबाबत तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ त्यानुसार सोमवारी सापळा लावण्यात आला़ मोहिते यांनी मागणी केलेली ४० हजार रुपयांची लाचेची रक्कम तक्रारदाराकडून घेताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़ (प्रतिनिधी)