संदीप झिरवाळ : पंचवटीगावठाण परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग ४, ८ व १२ मिळून नवीन प्रभाग रचनेनुसार तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये दोन विद्यमान, तर दोन माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. या प्रभागात सुरुवातीपासूनच कॉँग्रेस व मनसे एकत्र निवडणूक लढविणार असल्याचे वारे वाहत होते आणि प्रत्यक्षात झालेही तसेच. प्रभागात मनसेने दोन, तर कॉँग्रेस व राष्ट्रवादीने एकही उमेदवार न दिल्याने अपक्ष विरुद्ध भाजपा, मनसे अशीच लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांचा मागासवर्ग ‘अ’ गटातून दोन आजी-माजी नगरसेवक रिंगणात असून, यात भाजपाच्या विद्यमान नगरसेवक फुलावती बोडके यांचे पुत्र माजी नगरसेवक कमलेश बोडके तर शिवसेनेचे माजी नगरसेवक व ऐनवेळी मनसेने उमेदवारी दिलेले उल्हास धनवटे, माजी नगरसेवक कै. संजय अदयप्रभू यांचे चुलत बंधू मनोज अदयप्रभू यांना भाजपाने डावलल्याने ते शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात आहेत. बोडके व धनवटे यांनी यापूर्वी नेतृत्व केलेले आहे. धनवटे हे मनसे प्रदेशाध्यक्ष राहुल ढिकले समर्थक असल्याने ढिकले पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरले आहेत, तर बोडके यांच्या पाठीमागे नातेवाईक व युवकांची मोठी फळी असल्याने ते चांगली लढत देण्याची शक्यता आहे. या गटातील लढाई भाजपा, मनसे व शिवसेना अशी तिरंगी होणार आहे. सर्वसाधारण महिला ‘ब’ गटात मनसेकडून नंदिनी बोडके, भाजपाकडून रम्मी राजपूत यांच्या भगिनी सीमा राजपूत, शिवसेनेकडून रागिनी तांबे या निवडणूक रिंगणात आहेत. या प्रभागातील सर्वसाधारण ‘ड’ गटातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. उपमहापौर गुरुमित बग्गा हे अपक्ष तर माजी खासदार माधवराव पाटील यांचे सुपुत्र संजय पाटील हे भाजपाकडून रिंगणात असून या दोघांमध्येच काट्याची लढत होईल. शिवसेनेने अनिल बागुल यांना उमेदवारी दिली आहे. पालिकेचा दीर्घ अनुभव असलेले बग्गा यांनी मनसेसह अपक्षांचे पॅनल तयार केले असल्याने खरी लढत बग्गा विरुद्ध भाजपा अशीच होणार आहे.
सेना - भाजपापुढे महाआघाडीचे आव्हान
By admin | Updated: February 15, 2017 00:04 IST