मालेगाव : शहरातील गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर सदर आरोपीने सहकाऱ्यांसह हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित आरोपी इम्रान ऊर्फ शिट्टी, शफीक, इफ्तेकार चोखा, आसिफ ड्रायव्हर (पूर्ण नाव माहीत नाही) आदिंवर येथील पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई गिरीष रामकृष्ण बागुल यांनी पवारवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी बागुल हे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना त्यांना रात्री साडेनऊ वाजेला येथील साठफुटी रस्त्यावरील मुकादम चहाच्या हॉटेलजवळ सदर संशयित आरोपी इम्रान हा सात ते आठ जणासह उभा असलेला दिसला. त्यावेळी बागुल यांनी संशयितास पोलीस ठाण्यात चल असे सांगितले असता, संशयित इम्रानने सहकाऱ्यांना उद्देशून ‘ये पुलिसवाला है, बहुत मात गया है’ म्हणत कमरेची पिस्तूल काढून बागुल यांच्या गळ्यावरील कंठाला लावत जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी दुसऱ्या संशयित शफीक व इफ्तेकार चोखा यांनी बागुल यांच्यावर तलवारीने हल्ला केला असता, त्यांनी तो चुकवला. त्यामुळे आसीफ ड्रायव्हर हा चार ते पाच साथिदारांसह लाकडी दांड्याने मारण्यास सुटला असता बागुल हे पळून गेल्याने थोडक्यात बचावले. या प्रकरणी पवारवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे शहरवासीयांसह पोेलीस दलात खळबळ माजली आहे. (प्रतिनिधी)
आरोपीचा पोलिसावर सशस्त्र हल्ला
By admin | Updated: November 1, 2015 22:24 IST