नाशिक : अपहृत नंदिनीचा शोध घेण्यास पोलीस यंत्रणेला यश आलेले असले तरी, त्याच धर्तीवर दोन वर्षांपासून अपहरण झालेल्या विनोद आव्हाड या तरुणाचा ज्याप्रमाणे शोध लागलेला नाही, त्याचप्रमाणे विनोदच्या अपहरणात पोलिसांत गुन्हा दाखल झालेल्या संशयितांपैकी अर्जुन ठाकूर नामक इसमही या घटनेनंतर गायब झाला असून, त्याचाही तपास लागत नसल्याने ठाकूर याच्याशी आर्थिक संबंध ठेवून असलेल्यांना आशा सोडून द्यावी लागली आहे. आव्हाड, ठाकूर यांच्याशी शिवदास सातपुते याचा निकटचा संबंध होता हे विशेष नमूद करण्यासारखे आहे. शहरातील ‘स्पा’ व्यावसायिकांशी निगडित असलेल्या या घटनेला नंदिनी शर्मा या बालिकेच्या अपहरण घटनेनंतर उजाळा मिळाला आहे. त्यातून विनोद आव्हाड या तरुणाचे जसे अचानक गायब होणे आश्चर्यकारक आहे, तसेच अर्जुन ठाकूर हा इसमदेखील शहरातून गायब झाला. त्याच्या गायब होण्याची कोणतीही नोंद पोलीस दप्तरात नाही, त्यामागचे कारणदेखील मनोरंजक असून, हा ठाकूर शहरात कोठून व कसा दाखल झाला त्याविषयी अनेक वदंता आहेत व अल्पावधीतच त्याने ‘स्पा’ व्यवसायात स्वत:ला गुंतवून घेतानाच शहरातील बडे व्यापारी व व्यावसायिकांनाही जाळ्यात ओढून आपले हातपाय पसरविले होते. त्यातूनच त्याचे व अपहृत विनोद आव्हाड याचेही संबंध जुळले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र विनोद याचे अपहरण होण्यापूर्वी ठाकूरदेखील नाशकातून गायब झाला; परंतु त्यानंतरही त्याचे विनोद याच्याशी संभाषण सुरू असल्यामुळे त्याचाही अपहरणात हात असण्याचा संशय सौ. आव्हाड यांनी व्यक्त केला होता.
विनोद आव्हाडप्रमाणे अर्जुन ठाकूरही गायब
By admin | Updated: December 9, 2015 00:18 IST