नाशिक : गणेश विसर्जनाच्या दिवशी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींपासून जलप्रदूषण रोखण्यासाठी नाशिक महापालिकेनेही पुणे महापालिकेच्या धर्तीवर अमोनियम बायकार्बोनेटचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्याचे ठरविले असून, त्यासाठी राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर्सकडून ६ टन अमोनियम बायकार्बोनेट मागविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी दिली.पीओपी मूर्तीपासून जलप्रदूषण रोखण्यासाठी पुणे महापालिकेने अभिनव प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. घरोघरच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी पुणे महापालिका नागरिकांना सोडा अर्थात अमोनियम बायकार्बोनेट हा पदार्थ मोफत उपलब्ध करून देणार आहे. सदर पदार्थ पाण्यात टाकल्यास त्यात पीओपी मूर्ती काही तासांमध्ये विरघळते. पुणे महापालिका आणि कमिन्स इंडिया कंपनी यांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या सहकार्याने हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येही असा उपक्रम राबविता येईल काय, यासाठी महापालिकेने चाचपणी केली. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनीही त्यासाठी पुढाकार घेत प्रशासनाला प्रस्ताव पाठविला. त्यानुसार, महापालिकेने येत्या गुरुवारी (दि.१५) होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रायोगिक तत्त्वावर अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर कंपनीकडून ६ टन अमोनियम बायकार्बोनेट मागविण्यात आले आहे. सहाही विभागात प्रत्येकी एक टन अमोनियम बायकार्बोनेट उपलब्ध करून दिले जाणार असून, मनपातर्फे उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी टाकण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मनपाने मागविले ६ टन अमोनियम बायकार्बोनेट
By admin | Updated: September 13, 2016 01:27 IST