मालेगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे तलावाची उंची व क्षमता वाढविण्यासाठी शेजारील रावळगावच्या शेती महामंडळाची शंभर एकर जमीन मालेगाव महानगरपालिकेला देण्यास राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजुरी दिली.या संदर्भात महसूलमंत्र्यांनी ताबा पत्र दिले असून, त्यासाठी मालेगाव महापालिकेला शासनास १ कोटी ५२ लाख रुपये भरावे लागणार आहेत. माजी आमदार शेख रशीद यांच्या कार्यकाळातील २००४ पासून तळवाडे तलावाची उंची व क्षमता वाढविण्याकरीता शेती महामंडळाची जागा मिळावी अशी मागणी करण्यात येत होती. सदर मागणी मंजूर झाल्याची माहिती आमदार दादा भुसे व माजी आमदार शेख रशीद यांनी दूरध्वनीवरून ‘लोकमत’ ला दिली.आता तळवाडे साठवण तलावाची क्षमता वाढल्याने लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मालेगाव महापालिकेची हद्दवाढ होऊन सहा गावांचा समावेश (पान २ वर)झाल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण होणार आहे. सध्या पंपींगने पाणी उचलण्यासाठी सहा ते सात कोटींचा खर्च मनपाला येतो.बैठकीस आमदार दादा भुसे, महापौर सौ. ताहेरा शेख, मनपा आयुक्त अजीत जाधव, अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आदि अधिकारी उपस्थित होते.