नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून रामकुंडानजीकचे वस्त्रांतरगृह पाडून टाकण्याचे आदेश देणारे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घुमजाव केले असून, सदरची वास्तु मोठी व धार्मिक कारणांसाठी वापरली जात असल्याचे सांगण्यात आल्याने ती पाडण्याबाबत अगोदर पाहणी केली जाईल व मगच निर्णय घेतला जाईल, असे सांगून याबाबतची संदिग्धता कायम ठेवली आहे. गेल्या आठवड्यात साधु-महंतांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आमदार देवयानी फरांदे यांनी हा विषय उपस्थित केला असता, महंत ग्यानदास यांनी वस्त्रांतरगृहाच्या इमारतीमुळे शाहीस्नानासाठी साधुंना अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले होते. या वस्त्रांतरगृहामुळे आपण पाण्यात बुडता बुडता वाचलो अशी पृष्टी जोडून त्यांनीही वस्त्रांतरगृह तत्काळ काढून टाका अशी सूचना केली, तर फरांदे यांनी वस्त्रांतरगृहामुळे रामकुंडावर सूर्यप्रकाश पडत नाही त्याचबरोबर गोदावरी मंदिराला प्रदक्षिणा घालण्यातही अडचणी येत असल्याचे सांगितले होते. या सूचनांचा आधार घेत पालकमंत्री महाजन यांनी वस्त्रांतरगृह पाडून टाकण्याचे आदेश महापालिका व जिल्हा प्रशासनाला दिले होते. या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी रामकुंडावर धार्मिक विधी करणाऱ्या पुरोहित संघाने वस्त्रांतरगृह पाडण्यास विरोध दर्शवून महंत ग्यानदास यांची भेट घेतली व त्यांची मनधरणी केली, तर पालकमंत्री महाजन यांच्याकडेही विरोध प्रकट केला होता. वस्त्रांतरगृहाबाबत परस्परविरोधी भूमिका सुरू झाल्याने महाजन यांनी आमदार बाळासाहेब सानप यांना संबंधितांशी चर्चा करण्याची सूचना केली होती. शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी वस्त्रांतरगृहाची वास्तू ही शासनाच्या निधीतून उभारण्यात आली असून, ती बरीच मोठी असल्याचे आपल्याला सांगण्यात आले. या वास्तुचा उपयोग धार्मिक विधींसाठी केला जात असल्याचेही लक्षात आणून देण्यात आले. वस्त्रांतरगृह पाडून टाकण्याच्या सूचना आपण केल्या असल्या तरी, त्यावेळी ही वास्तु इतकी मोठी व शासननिर्मित असेल याची कल्पना नव्हती. आता मात्र आपण स्वत:च या वास्तुला भेट देऊन त्याची उपलब्धता व गरज तपासून पाहणार असून, त्यानंतरच ती पाडायची की, राहू द्यायची याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांनी बदललेल्या या भूमिकेमुळे वस्त्रांतरगृहाला अभय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
वस्त्रांतरगृह : पालकमंत्र्यांचे घुमजाव
By admin | Updated: January 16, 2015 23:26 IST