दिंडोरी : शहराच्या मध्यभागी असलेल्या धामण नदी किनारच्या सीताफळ बागेतून पाच-सहा महिला भर दुपारच्या वेळेत तान्ह्या मुलांना कडेवर घेऊन पेठ गल्लीत घुसल्या ... कुणाला वाटलं भिक मागणाऱ्या महिला असाव्यात, पण त्या कुणाकडं भिक मागत नव्हत्या. सरळ गल्लीने त्या पुढे जात असताना गल्लीत खेळणारी लहान मुलं घाबरली आणि आपल्या घरांकडे पळाली... कुणीतरी शंका व्यक्त केली या पोरधऱ्या (पोर पळविणाऱ्या )आहेत... तसा गल्लीत गोंगाट सुरू झाला...त्या महिलांना विचारणा करण्यासाठी एक जण पुढे धजावला...काहीएक न बोलता महिलांनी धूम ठोकली ती थेट दिंडोरीच्या चौफुलीवर ... घाई घाईने रिक्षात बसून वणीकडे मार्गस्थ झाल्या... इकडे पेठ गल्लीतून पोर पळवून नेल्याची अफवा संपूर्ण गावात पसरली. एव्हाना ही बातमी रिक्षाचालकांनाही समजली. काही रिक्षाचालकांनी तत्काळ त्या महिला ज्या रिक्षात गेल्या त्या रिक्षाचालकाशी भ्रमण ध्वनीवरून संपर्क साधत रिक्षा परत आणायला सांगितली. रिक्षाचालकाने सिड फार्मजवळ रिक्षा माघारी फिरवली हे बघताच महिला पुन्हा पळू लागल्या त्याचवेळी समोरून दिंडोरी पोलीस ठाण्याचे हवालदार सौंदाणे व साबळे दिंडोरीकडे येत होते.त्यांनी तत्काळ या महिलांना ताब्यात घेत चौकशीसाठी दिंडोरी पोलीस ठाण्यात नेले. तेथे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी कोणतेही मुले वगैरे पळविले नसल्याचे समजले. परंतु पोलीस निरीक्षक संजय शुक्ला व हवालदार सौंदाणे यांच्या पोलिसी नजरेने महिलांनी काही तरी गुन्हा केल्याचे हेरले आणि महिला शिपाई कदम यांना त्यांची झडती घ्यायला सांगितले. त्यातील एका महिलेकडे चक्क एक लाख बावीस हजार रुपये सापडल्याने त्यांचा संशय खरा ठरला. याबाबत चौकशी सुरू असतानाच एक गृहस्थ घाबरेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात आला. बसमधून एका महिलेने एक लाख वीस हजार रुपये बॅगेतून चोरल्याची तक्रार त्यांनी केली. सदर गृहस्थांना त्या महिलांसमोर नेले असता पैसे चोरणाऱ्या महिलेला सदर गृहस्थांनी ओळखले अन् पाकीटमार महिलांच्या टोळीचा पर्दाफाश झाला. एकंदरीत पोरधऱ्या बायांची आवई उठली अन् पोलिसांच्या सतर्कतेने महिलांची पाकीटमार टोळी पकडली गेली. (वार्ताहर)
पोरधऱ्यांची आवई उठली अन् पाकीटमार महिलांची टोळी गावली!
By admin | Updated: July 14, 2014 00:34 IST