----------------------
शौचालयाच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू
मालेगाव : सकाळपासून शहरातील ३ कंदील गुरूबेदनगरमध्ये शौचालयाच्या सेप्टिक टाकीत पडून मोहंमद जुनेद सद्दाम कुरैशी (३) या बालकाचा मृतदेह आढळून आला आहे. सकाळपासून मोहंमद जुनेद हा बेपत्ता होता. सकाळी गल्लीत खेळत होता. बराच वेळ झाला तरी तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. आझादनगर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. शोध सुरू असताना बालकाचा मृतदेह घराजवळील शौचालयाच्या सेप्टिक टाकीत आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास निरीक्षक दिलीप पारेकर हे करीत आहेत.
फोटो फाईल नेम : ०३ एमडीईसी ०१ . जेपीजी - मोहंमद जुनेद
------------------------
मालेगावी ६ डिसेंबरला वाढीव पोलीस बंदोबस्त
मालेगाव : बाबरी मशीदपतनाच्या २८ व्या स्मृती दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरात वाढीव पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करीत शांतता ठेवावी. कुणी कायदा हातात घेतला तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दिला आहे. अयोध्या श्रीराम मंदिरप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गेल्यावर्षी बाबरीपतन दिन निषेध करणाऱ्यांची संख्या घटली होती. मात्र, काही सामाजिक संघटनांकडून सामूहिक अजान पठण करण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या प्रमुख चौकांमध्ये सशस्त्र बंदोबस्त ठेवला जाणार आहे. यासाठी पोलीस उपअधीक्षक २, पोलीस निरीक्षक ५, सहायक पोलीस निरीक्षक १४, पोलीस कर्मचारी १४०, गृहरक्षक दल जवान ९०, दंगा नियंत्रण पथक १, राज्य राखीव पोलीस बल कंपनी जवान १०० तैनात केले जाणार आहेत.
-------------------
हद्दपार गुन्हेगाराला अटक
मालेगाव : हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरणाऱ्या मुसद्दीक अहमद खुर्शीद अहमद ऊर्फ मुसा या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. मुसा याला धुळे व नाशिक जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. आझादनगर पोलिसांनी हद्दपारीच्या आदेशाची अंमलबजावणी करून मुसाला अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी भागात सोडले होते. मात्र, मुसा काही दिवसांपासून शहरात वावरत होता. जमहूर हायस्कूलजवळ फिरताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर करीत आहेत.
------------------
अब्दुल्लानगर भागात साफसफाईची मागणी
मालेगाव : शहरातील अब्दुल्लानगर, इस्तेमानगर भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच गटारी तुडुंब भरल्या आहेत. गटारींचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डास, मच्छरांमुळे साथीचे रोग वाढले आहेत. या परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी अब्दुल अजीज अब्दुल शकूर मिस्तरी रोड सोशल कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त दीपक कासार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
------------------
संगमेश्वरात जलवाहिन्यांची दुरुस्ती
संगमेश्वर : शहरातील संगमेश्वर भागात जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. परिणामी परिसरात दूषित पाणीपुरवठा केला जात होता. याबाबत नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत पाणीपुरवठा विभागाला गळती रोखण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. गेल्या चार दिवसांपासून सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
---------------------
उद्यानांची साफसफाई करण्याची मागणी
मालेगाव : शहरातील उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यानंतर या भागात स्वच्छता केली गेली नाही. परिणामी घाण व गवत वाढले आहे. महापालिकेने उद्यानांची स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.
-----------------------
शाळा-महाविद्यालयांमध्ये वाढू लागली गर्दी
मालेगाव : कोरोनाकाळात शाळा-महाविद्यालयांतील प्रशासकीय काम बंद पडले होते. सध्या ११वी प्रवेश प्रक्रिया व विविध प्रकारच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या मेरीट फॉर्म व इतर कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी विद्यार्थी व पालकांची शाळा-महाविद्यालयांमध्ये गर्दी होत आहे.