नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करणाऱ्या कोंडाजी आव्हाड यांचे अपील न्यायालयाने फेटाळले असून, त्यामुळे त्यांना निवडणूक लढविता येणार नाही. अशाच प्रकारे पाच अपिलेही फेटाळण्यात आली आहेत. केवळ नामदेव शिंदे आणि विजय पिंगळे यांचे अर्ज मंजूर झाले आहेत.जिल्हा बॅँक निवडणुकीच्या छाननीच्या वेळी आव्हाड आणि अन्य काही उमेदवारांविरुद्ध आक्षेप घेण्यात आले होते. त्यावर छाननी होऊन त्यात नऊ जणांवरील आक्षेप मान्य झाल्याने त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले होते. त्यापैकी कोंडाजी आव्हाड हे प्रतिनिधित्व करीत असलेल्या सोसायटीचा आॅडिट वर्ग अ किंवा ब असणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात मात्र क वर्ग असल्याने आक्षेप घेण्यात आला होता. तथापि, अपिलातही त्यांचा अर्ज फेटाळला गेला. याशिवाय कमलाकर शंकर पवार, उषाताई भीमराव जेजुरे, भीमराव कोंडाजी जेजुरे, चंद्रकांत राजे, शिवाजी ठेपले यांचे अपिल फेटाळ्यात आले आहे. सहनिबंधकांच्या या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याची सोय असली तरी शनिवार आणि रविवार या दोन सलग सुट्या आहेत, तर सोमवारी (दि. ११) दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेण्याची अंतिम मुदत आहे आणि १२ तारखेला चिन्ह वाटप होणार आहे.
कोंडाजी आव्हाड यांचे अपील फेटाळले
By admin | Updated: May 8, 2015 23:48 IST