मालेगाव : येथील मालेगाव एज्युकेशन सोसायटीच्या चारही शाखांतील जवळपास चार हजार विद्यार्थी - विद्यार्थिनींनी मिळून येथील मोसम नदीच्या प्रदूषणाविरोधात मोसम नदीपात्राभोवती मानवी साखळी तयार केली. सोसायटीच्या झुं. प. काकाणी विद्यालय, कै. रा. क. काकाणी कनिष्ठ महाविद्यालय, सौ. रु. झुं. काकाणी कन्या विद्यालय व नवीन प्राथमिक शाळा या चारही शाखांमधील सुमारे चार हजार विद्यार्थी - विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. रामसेतू उर्दू वाचनालयापासून या मानवी साखळीस प्रारंभ झाला. मोसमच्या पूर्वेस नदीकिनारी विद्यार्थी शिस्तीने उभे होते. डॉ. आंबेडकर पुलावर हातात छत्रीधारक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे गायन केले.नरेंद्र गुरव यांनी मोसम नदीचे उगम, प्रवाहमार्गात येणारी गावे याविषयीची माहिती सांगितली. संचालक नीलेश लोढा यांनी मोसम नदीत प्रदूषण न करण्याविषयीची प्रतिज्ञा वदवून घेतली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक राजेंद्र अमीन होते. याशिवाय चारही शाखांमध्ये कार्यरत असलेले १२५ शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासोबत संचालक रामनिवास सोनी, प्रकल्पप्रमुख सतीश कलंत्री, नितीन पोफळे यांच्यासह प्राचार्य अशोक मोरे, उपमुख्याध्यापक के. आर. बागुल, मुख्याध्यापक एस. पी. मोरे, श्रीमती कविता मंडळ आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)