नाशिकरोड : शाह, छप्परबंद, फकीर जमातीला विमुक्त जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र विनाविलंब देण्यात यावे या मागणीसाठी अंजुमन मुस्लीम शाह बिरादरी संघटनेतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यात शाह, छप्परबंद, फकीर समाजाची ३० लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. या तीनही समाजाची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती अत्यंत हलाखीची व बिकट आहे. शासन नियुक्त समितीच्या शिफारसीनुसार शाह, छप्परबंद, फकीर समाजाला विमुक्त जातीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित तीनही समाजबांधवांना विमुक्त जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र विनाविलंब देण्यात यावे या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर सोमवारी दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. धरणे आंदोलनामध्ये अंजुमन मुस्लीम शाह बिरादरीचे राज्याचे अध्यक्ष डॉ. शौकत शाह, प्रा. इकबाल शाह, दादाभाई शाह, भिकन हाजी शाह, आरीफ शाह, शाहबान शाह, जाकीर शेख आदिंसह राज्याच्या विविध भागांतून शेकडो समाजबांधव धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
अंजुमन मुस्लीम शाह बिरादरीतर्फे धरणे आंदोलन
By admin | Updated: October 5, 2015 23:40 IST