पंचवटी : तपोवन शिवारात रात्रीच्या वेळी जनावरे चोरणारी टोळी कार्यरत असून, पशुधन चोरणाऱ्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तपोवनात पोलीस गस्त वाढवून जनावरे चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करावे, अशी मागणी तपोवनातील नागरिकांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात जनावरे चोरणाऱ्या टोळीचा उपद्रव सुरू असून, जनावरे चोरण्यासाठी चारचाकी गाड्यांचा वापर केला जातो. ही टोळी दिवसा टेहळणी करून रात्रीच्या वेळी शेत मळे परिसरात तसेच घराच्या बाहेर दावणीला बांधलेली जनावरे चोरून नेत आहे. गेल्या महिन्यात तपोवनातील जनार्दनस्वामी आश्रम परिसरातून दोन ते तीन जनावरे चोरून नेल्याची घटना घडली. यापूर्वीदेखील मळे परिसरात अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. शहरात जनावरे चोरणारी टोळी पुन्हा कार्यरत झाल्याने या टोळीचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जनावरे चोरणाऱ्या टोळीचा उपद्रव
By admin | Updated: July 21, 2014 00:57 IST