पंचवटी : वाढत्या अपघातावर नियंत्रण बसावे यासाठी दुचाकीधारकांनी वाहने चालविताना हेल्मेट, तर चारचाकी वाहनधारकांनी शिटबेल्टचा वापर करावा, असे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देश असल्याने त्याची सोमवारपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नागरिकांपाठोपाठ प्रादेशिक परिवहन कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट आणि शिटबेल्टची सक्ती करण्यात आल्याने ज्या नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी नियमांची अंमलबजावणी केली अशाच कर्मचारी व नागरिकांना कार्यालयात प्रवेश देण्यात आला. हेल्मेट व शिटबेल्टचा वापर न करताच कार्यालयात येणाऱ्या जवळपास शंभरहून अधिक नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा परवाना काढणे, तसेच वाहनांची नोंदणी व कर भरण्यासाठी दैनंदिन शेकडो नागरिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात येत असतात. सर्वाेच्च न्यायालयाचे निर्देश असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाकडून कार्यालयाच्या आवारात जागोजागी हेल्मेट व शिटबेल्ट वापरा तसेच हेल्मेट व शिटबेल्ट शिवाय कार्यालयात प्रवेश मिळणार नाही असेफलक लावून जनजागृती करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारपासूनकार्यालयात येणाऱ्यांना सक्ती करण्यात आली आहे. कार्यालयात येणारे वाहनधारक तसेच कर्मचाऱ्यांनी हेल्मेट व शिटबेल्टचा वापर केला आहे की नाही हे तपासणीसाठी परिवहन विभागाचे चार मोटार वाहन निरीक्षक सकाळच्या वेळी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थांबतात तर इतरवेळी सुरक्षारक्षक नेमून दुचाकी वाहनधारकाने हेल्मेट आणि चारचाकी वाहनधारकाने शिटबेल्टचा वापर केला आहे की नाही हे बघूनच कार्यालयात प्रवेश दिला जात आहे. (वार्ताहर)
....अन्् हेल्मेटधारकांनाच मिळाला कार्यालयात प्रवेश
By admin | Updated: October 5, 2015 23:49 IST