नाशिक : ‘मैत्रेय’ गुंतवणूक घोटाळ्याच्या खटल्याचा निर्णय मंगळवारी (दि. २६) जिल्हा सत्र न्यायालयात झाला. न्यायालयाने सर्व ठेवीदारांना रक्कम व्याजासह परत करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच मैत्रेयचे संचालक वर्षा सत्पाळकर व जनार्दन परुळेकर यांचा न्यायालयाने अंतरिम जामीनही आज मंजूर केला.गेल्या गुरुवारी (दि.२१) झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्ष व मैत्रेयच्या वकिलांकडून युक्तिवाद पूर्ण करण्यात आला होता; मात्र न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत निर्णय प्रलंबित ठेवला होता. जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान न्यायाधीश एम.एच. मोरे यांनी मैत्रेयच्या सर्व ठेवीदारांना रक्कम वाटप करण्यास मंजुरी दिली. तसेच सत्पाळकर व परुळेकर यांचाही अंतरिम जामीन मंजूर केला. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. राजेंद्र घुमरे व चंद्रकोर यांनी बाजू मांडली. फसवणुकीची एकूण रक्कम ३१ कोटी २७ लाख रुपयांपर्यंत पोहोचली असून, तक्रारदारांची संख्या जवळपास चौदा हजार इतकी आहे. एस्क्रो खात्यामध्ये सध्या सहा कोटी ४२ लाख रुपये जमा असून, कंपनीच्या सर्व मालमत्तांची माहिती पोलिसांकडे असून एस्क्रो खात्यात वेगाने पैसे जमा होणार आहेत. सर्व ठेवीदारांना त्यांची मॅच्यूर झालेली रक्कम मिळणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्ह्णासह राज्यातील व राज्याबाहेरील गुंतवणूकदारांनाही न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. जगन्नाथन यांनी तपासी अधिकाऱ्यांच्या पथकाचे व सरकारी वकिलांचे अभिनंदन केले आहे. आर्थिक गुंतवणुकीच्या घोटाळ्यामध्ये संशयितांना केवळ शिक्षा होते; मात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्याचा आदेश प्रथमच न्यायालयाकडून आल्याने हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे जगन्नाथन म्हणाले. त्यांनी याचे श्रेय सांघिक कामगिरीला दिले आहे.
‘मैत्रेय’च्या सर्व ठेवीदारांना मिळणार रक्कम
By admin | Updated: July 26, 2016 23:57 IST