नाशिकरोड : आंबेडकर जयंतीची वर्गणी न दिल्याच्या कारणावरून महिलेसह तिच्या मुलास तिघांनी बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केल्याची घटना शनिवारी उपनगरमधील चव्हाण मळ्यात घडली़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध खंडणी तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़के.जे़ मेहता हायस्कूलजवळील चव्हाण मळ्यालगत असलेल्या झोपडपट्टीत अनिता रमेश राखपसारे (३७) या मुलासह राहात असून, बिगारी काम करतात़ शनिवारी सायंकाळी कामावरून परतल्या असता संशयित रवि खरात, छाया खरात व बापू शिंदे हे घरी आले व डॉ़ आंबेडकर जयंतीसाठी ५०० रुपयांच्या वर्गणीची मागणी केली़ यावर राखपसारे यांनी इतके पैसे जवळ नसून सोमवारी पगार झाल्यावर देईल, असे सांगितले़ यावर संशयित खरात यांनी आताच पैसे द्या नाहीतर तुमच्याकडे बघून घेऊ, असा दम दिल्याने त्यांनी ३०० रुपये दिले व उर्वरित नंतर देते, असे सांगितले़ या गोष्टीचा राग येऊन संशयितांनी अनिता राखपसारे यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्या बेशुद्ध पडल्या़ त्यावेळी त्यांचा मुलगा सोडविण्यास आला असता या तिघांनी त्यालाही मारहाण केली़ या प्रकरणी राखपसारे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी संशयित रवि खरात, छाया खरात व बापू शिंदे यांच्यावर खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे़ (प्रतिनिधी)
आंबेडकर जयंतीच्या वर्गणीवरून महिलेस बेदम मारहाण
By admin | Updated: March 29, 2016 23:35 IST