नाशिक : अॅण्ड्रॉइड तसेच अॅपल आॅपरेटिंग सिस्टम असलेल्या मोबाइलमध्ये खगोलशास्त्राप्रती आवड निर्माण व्हावी तसेच वेगवेगळ्या देशांनी अंतराळात सोडलेले सॅटेलाईट आपल्या परिसरातून केव्हा मार्गक्रमण करणार आहे याची माहिती आता अवघ्या एका क्लिकवर अनुभवता येणार असल्याची माहिती जयदीप शाह यांनी जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिली.अॅण्ड्रॉइड आणि अॅपल मोबाइलमध्ये विशिष्ट अॅप्स डाउनलोड केल्यानंतर आपण जीपीएस तंत्रज्ञान प्रणालीद्वारे फक्त मोबाइल आकाशाच्या दिशेने फिरवल्यास आपल्याला अवकाशातील सॅटेलाईट, ग्रह, तारे यांचे स्थान निश्चित समजण्यास मदत होणार आहे. त्र्यंबकरोड येथील यशवंतराव चव्हाण तारांगण येथे जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात विजय वैशंपायन यांनी शुक्र ग्रहावर भविष्यात मानवी वस्ती वसू शकेल का? तसेच शुक्र ग्रहावरील वातावरण याबद्दल उपस्थिताना माहिती दिली. तसेच मानवाला तेथे वस्ती करायची ठरल्यास तरंगते घर बांधावे लागेल, अशी माहिती दिली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मयुरी तातिया यांनी क्युबसेट आणि कॅनसेट या उपकरणांबद्दल माहिती दिली. यावेळी जयदीप शाह यांनी उपस्थिताना खगोलशास्त्राची आवड जोपासण्यासाठी टेलिस्कोप घेण्याचे आवाहन केले तसेच अनेक शास्त्रज्ञांना आपल्या कल्पना, आपली मते आणि विचार हे विद्यार्थ्यांसोबत शेअर करायचे असतात, परंतु नाशिकला विमानतळाची सोय नसल्याने आपल्याकडे शास्त्रज्ञ येण्यासाठी विरोध करतात नाशिक शहरातूनही अनेक वैज्ञानिक घडावेत यासाठी प्रशासनाने विमानतळासाठी पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचेही शाह यांनी आवर्जून सांगितले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षक हेदेखील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
खगोलशास्त्राला मोबाइलचीही मिळणार साथ
By admin | Updated: October 9, 2015 22:23 IST