निर्बंधानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोकादेखील कायम आहे. याशिवाय इतर राज्यांमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण, तसेच इतर देशांमध्ये कोरोनाचा सापडलेला नवा व्हेरिएंट यामुळे देशाची चिंता वाढलेली आहे. केंद्र सरकारनेदेखील गर्दीवर नियंत्रण राखण्याच्या सूचना दिल्यामुळे जिल्ह्यावर काही निर्बंध येऊ शकतात का, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर याबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.
महाराष्ट्रात मागील काही दिवसांत कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. याबरोबरच आगामी काळ सणासुदीचा असल्याने गर्दीमुळे तिसऱ्या लाटेचा धोका देण्यात आला आहे. यामुळे निर्बंधाची शक्यता वर्तविली जात असल्याने व्यापारी वर्गाकडून याबाबत जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्या अटोक्यात असली तरी मागील तीन दिवसांपासून पाॅझिटिव्ह रुग्णसंख्येने शंभरी ओलांडली आहे. याशिवाय जिल्ह्यात डेल्टा व डेल्टा प्लस बाधित रुग्ण आढळले असल्याने निर्बंधांबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय टास्क फोर्सला असला तरी निर्बंध लावण्याचा
स्थानिक पातळीवर अधिकार पालकमंत्र्यांना आहे, त्यामुळे त्यांची बैठक महत्त्वाची ठरणार आहे.