त्र्यंबकेश्वर : हजारो वर्षांपासून आखाडे, त्यांच्या देवता, साधू-महंत यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीत शाहीस्नान करण्याची प्रथा आहे. त्यांचे स्नान झाल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांनी गंगेच्या पाण्याला स्पर्शही करू नये, असा दंडक आजवर पाळला गेला. पण आता साधू-महंतांबरोबरच त्यांच्या भक्तांनाही शाहीस्नान करता यावे यासाठी आखाडेच आग्रह धरू लागले आहे. पहिल्या पर्वणीत नाशिक-त्र्यंबकेश्वर दोन्हीही ठिकाणी शाहीस्नानादरम्यान केवळ साधू-संन्याशांनीच स्नान करावे व भाविकांनी दहाही आखाड्यांचे शाहीस्नान आटोपल्यावर स्नान करावे यासाठी पोलीस प्रशासनाने कटाक्षाने प्रयत्न केले. मात्र यात धक्काबुक्की, लोटालोटीचे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले. आखाड्यांनीही पुढील पर्वणीत भाविकांना अडवू नये, असा सज्जड दम भरल्याने भाविकांना मोठ्या संख्येने प्रत्येक मिरवणुकीत सहभागी होऊन शांततेत स्नान करण्याची संधी मिळाली. भाविकांना कोणताही विरोध न होता स्नान, त्र्यंबकराजाचे दर्शन घेता आल्याने साधू-महंतांनीही समाधान व्यक्त केले.
आखाडे, भाविकांनी केला हट्ट पूर्ण
By admin | Updated: September 15, 2015 00:01 IST