लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : केंद्र शासनाची आंतर शहर आणि आंतरराज्यांना जोडणारी विमानसेवा नाशिकच्या पथ्यावर पडली असून, अनेक ठिकाणी ही सेवा सुरू झाल्यानंतर आता थेट कोलकत्याला जोडणारी विमानसेवा सुरू होणार आहे. मार्च महिन्यापासून ही सेवा सुरू होणार आहे. दरम्यान, नाशिकहून बेळगावसाठी नवीन सेवा सुरू झाली असून, सोमवारी (दि. २५) या सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
ओझर येथील विमानतळावरून गेल्या दीड ते दोन वर्षात माेठ्या प्रमाणात सेवा सुरू झाल्या आहेत. विशेषत: केंद्र शासनाच्या उडान योजनेचा मोठा लाभ नाशिकला झाला आहे. नाशिकमधून सध्या राज्यात नाशिक-पुणे तर आंतरराज्य विमान सेवेत दिल्ली, नाशिक - हैदराबाद, नाशिक - बेंगळूर, नाशिक - अहमदाबाद अशी सेवा सुरू आहे. त्यात स्पाईस जेटने दिल्ली, हैदराबाद, बंगळूर पाठोपाठ आता कोलकाता सेवा सुरू करण्याची तयारी केली असून, ती २८ मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, स्टार एअरच्या नाशिक - बेळगाव सेवेचा शुभारंभ साेमवारी (दि. २५) करण्यात आला. ओझर येथे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, भारती पवार, एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. शेषगिरीराव, व्यवस्थापन एस. बी. बधान, स्टार कंपनीचे सहायक व्यवस्थापक सी. ए. बोपन्ना, उद्योजक मनिष रावळ उपस्थित होते. या विमान सेवांमुळे नाशिकच्या उद्योग व पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी भुजबळ यांनी व्यक्त केला.