उपनगर : आगरटाकळी पंचशीलनगरमध्ये रविवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी दुचाकी पेटवून दिल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. आगरटाकळी भागात गेल्या काही दिवसांपासून वारंवार कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या घटना घडत असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची वेळ आली आहे.आगरटाकळी पंचशीलनगरमध्ये राहणारे हरेंद्र जगन्नाथ पगारे यांची हीरो होंडा पॅशन (एमएच १५ एई ८६६२) ही दुचाकी रविवारी रात्री नेहमीप्रमाणे घरापुढे लावलेली होती. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी सदर दुचाकीवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली. घराबाहेरील विजेचे मीटरदेखील आगीत भस्मसात झाले आहे. पगारे व आजूबाजूच्या रहिवाशांच्या गाड्यांना आग लागल्याचे लक्षात येईपर्यंत दुचाकी आगीत जळून खाक झाली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच उत्तरानगर येथे चारचाकी गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्या होत्या. आगरटाकळी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहनांची मोडतोड, आग लावणे, घरांवर दगडफेक करून दहशत माजवणे अशा घटना वारंवार घडू लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
आगरटाकळीला दुचाकी पेटविली
By admin | Updated: November 23, 2015 23:54 IST