पंचवटीत पंचवटी कारंजा येथे महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात तसेच हिरावाडी त्रिकोणी बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या मनपा उपकेंद्रात नागरिकांना लस उपलब्ध करून दिली आहे. दैनंदिन या केंद्रात नागरिकांच्या सकाळपासून रांगा लागलेल्या असतात. इंदिरा गांधी रुग्णालयात गुरुवारी सकाळी लस उपलब्ध नव्हती. दुपारी लस आल्यानंतर अनेक नागरिक लस घेण्यासाठी रुग्णालयात असलेल्या प्रतीक्षा खोलीत रांगेत उभे राहिले असल्याचे चित्र दिसून आले. तर हिरावाडी त्रिकोणी बंगल्याच्या मागे असलेल्या उपकेंद्रात ज्येष्ठ नागरिकांची गर्दी झाली होती. अशीच परिस्थिती मायको रुग्णालयात बघायला मिळाली.
रुग्णालयात नागरिकांचे लसीकरण होत असले तरी केवळ रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून नागरिकांत हमरीतुमरी होत असल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे याच रुग्णालयात लस घेण्यासाठी आलेले नागरिक फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याने संसर्ग होण्याचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.