नाशिकरोड : बिटको महाविद्यालय, दत्तमंदिर सिग्नल, फेम टॉकीज या भागात सहायक पोलीस आयुक्त माधव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी १६५ दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.बिटको महाविद्यालयाच्या पोलीस चौकीजवळ सहायक पोलीस आयुक्त माधव ठाकूर, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता अचानक कारवाई करण्यास सुरुवात केली. लायसन्स नसणे, विना नंबर प्लेट, कागदपत्रे, ट्रीपलशिट, रश ड्रायव्हिंग करणाऱ्या १२५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींचादेखील समावेश आहे. विशेष म्हणजे महाविद्यालय शिक्षणाशी संबंध नसलेल्या पण त्या परिसरात वावरणाऱ्या टवाळखोर युवकांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांच्या पालकांना पोलिसांनी बोलवून घेत त्यांच्या कारनाम्याची माहिती दिली. फेम टॉकीज व दत्तमंदिर सिग्नल या दोन्ही ठिकाणी मिळून एकूण १६५ दुचाकीचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. महाविद्यालयाच्या आवारात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे टवाळखोरांनी आज त्या भागातून काढता पाय घेतला होता. पोलिसांनी दररोज अशी कारवाई करून छेडछाड करणाऱ्यांना वठणीवर आणणे, अशी मागणी पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)
दुचाकीचालकांवर कारवाई
By admin | Updated: July 23, 2016 01:32 IST