------------------------------------------------------------------
मालेगावी नागरिक फिरतात मास्कविना
मालेगाव: महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरात नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे अनिवार्य केलेे असताना शहरातील नागरिक मास्क न वापरता फिरकत असल्याचे दिसून येत आहेत. महापालिका आणि पोलिसांकडून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून देखील नागरिक मास्क न वापरता फिरत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
सध्या थंडी दिवसेंदिवस वाढू लागली असून अडीच महिन्यांपूर्वी कोरोनाबाधितांची शहरात केवळ ४३ इतकी संख्या होती. ती वाढत जाऊन सुमारे दोनशेपर्यंत जाऊन पोहोचली होती. आरोग्य विभागाने नियंत्रण मिळवत कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा ८३ पर्यंत आणण्यात यश मिळविले होते. परंतु वाढती थंडी आणि नागरिकांची बेफिकीर वृत्ती यामुळे पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली असून, ती पुन्हा १५० च्यावर पाेहोचली आहे. शहरातील पूर्व भागात मोठ्या संख्येने नागरिक मास्क न लावता हॉटेल्स आणि इतर दुकानांवर गर्दी करीत आहेत. महानगरपालिका आणि पोलिसांनी केवळ कारवाईची घोषणा न करता मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरोधात दंडाची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.