नाशिक : शहराचे वर्दळीचे ठिकाण असलेल्या वकीलवाडी भागात नेहमीप्रमाणे शनिवारी (दि. १६) वर्दळ सुरू असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास जुने मोठे कडुनिंबाचे झाड अचानकपणे उन्मळून रस्त्यावर पडले अन् परिसरातील सर्वच व्यावसायिक व ग्राहकांचा काळजाचा ठोका चुकला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला.वकीलवाडी परिसरात मोबाइल अॅसेसरिज, दवाखाने, खासगी क्लासेस, हॉटेल्स मोठ्या संख्येने असून या भागात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. शनिवारी दुपारी नागरिकांची रहदारी सुरू असताना अचानकपणे कडुनिंब कोसळला. सारडा संकुल परिसरातील व्यापाऱ्यांकडून ज्या झाडाच्या सावलीमध्ये उन्हाळ्यात पाणपोई थाटली जात होती तेच झाड कोसळले. या दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला अन् एकच धावपळ उडाली. काही युवकांनी पडलेल्या झाडाच्या दिशेने धाव घेत बचावकार्यासाठी प्रयत्न केले. झाडाच्या खोडाखाली एक दुचाकीस्वार अडकून पडल्याचे लक्षात आल्यानंतर जमलेल्या शेकडो युवकांनी खोड हलविण्याचा प्रयत्न केला; मात्र खोड मोठे असल्यामुळे त्यांचे प्रयत्न असफल ठरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन मुख्यालयासह पंचवटी, विभागीय अग्निशमन कार्यालयाचे प्रत्येकी एक बंब असे तीन बंब व जवान घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, राज्य शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सुविधा देणाऱ्या रुग्णवाहिका, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले अन् बचावकार्याला युद्धपातळीवर प्रारंभ करण्यात आला. जवानांनी इलेक्ट्रॉनिक कटरच्या साहाय्याने तातडीने खोड व फांदा कापण्यास सुरुवात केली. यावेळी एअर लिफ्ट बॅग वजनदार खोडाच्या खाली पसरवून जवानांनी त्यामध्ये हवा भरण्यास सुरुवात केली तसेच काही जवानांनी दोरखंडाने खोड व फांद्यांना आधार दिला. हवेच्या वजनाने खोड वरच्या दिशेने उचलले जाऊन त्याखाली अडकलेल्या युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत तीन युवक जखमी झाले असून दोन मोटारी व पाच दुचाकींचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.
दुर्घटना टळली !
By admin | Updated: July 17, 2016 00:15 IST